पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धा

कुमार गटात ऍव्हेंजर्स संघाला विजेतेपद
खुल्या गटात टस्कर्स संघाला विजेतेपद

| पुणे | प्रतिनिधी |

पीवायसी हिंदु जिमखानातर्फे आयोजित तिसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत कुमार गटात अंतिम फेरीत ऍव्हेंजर्स संघाने गार्डीयन्स संघाचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. तर, खुल्या गटात अंतिम फेरीत टस्कर्स संघाने ग्लॅडिएटर्स संघाचा टायब्रेकरमध्ये 2-1 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथील मैदानावर पार पडलेल्या कुमार गटातील या स्पर्धेत चुरशीच्या अंतिम लढतीत दोन्ही संघानी सुरुवातीपासूनच तोडीस तोड खेळ केला. 7व्या मिनिटाला विहान राठोडने गोल करून ऍव्हेंजर्स संघाचे खाते उघडले. पूर्वार्धात हि आघाडी कायम राखली होती. उत्तरार्धात, अठराव्या मिनिटाला अनय इंगळहळीकरने मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. अखेरपर्यंत हि बरोबरी कायम राहिली. निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकरमध्ये खेळविण्यात आला.

तर, खुल्या गटातील स्पर्धेत चुरशीच्या अंतिम लढतीत दोन्ही संघानी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. 12व्या मिनिटाला जेहान कोठारीने दिलेल्या पासवर मनन जोशीने गोल करून टस्कर्स संघाचे खाते उघडले. पूर्वार्धात हि आघाडी कायम होती. उत्तरार्धात, मात्र 25व्या मिनिटाला ग्लॅडिएटर्सच्या विक्रम भावेने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आघाडी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकरमध्ये सामना खेळविण्यात आला.

स्पर्धेतील कुमार गटातील व खुल्या गटातील विजेत्या संघांना आकर्षक चषक देण्यात आले. तसेच, कुमार गटातील बेस्ट डिफेंडर आनंदी बेडेकर व अथर्व इंगळहळीकर, मोस्ट असिस्ट ओजस नाईक, गोल्डन ग्लोव्ह आरुष दिवेकर, गोल्डन बूट विहान राठोड, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट संवित कासट तर खुल्या गटात बेस्ट डिफेंडर दर्शन कांकरिया, मोस्ट असिस्ट तनिश दादलानी, गोल्डन ग्लोव्ह सिद्धांत पवार, गोल्डन बूट यश भिडे, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट जेहान कोठारी यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदु जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर आणि रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version