| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील सोगाव आदिवासी वाडीजवळ शनिवारी (दि.31) ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास भला मोठा अजगर आला होता, हा अजगर एका आदिवासी मुलाला दिसल्यानंतर त्याने याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना दिली, सचिन घाडी यांनी वेळ न दवडता ही माहिती आपल्या परिसरातील सर्पमित्रांना मोबाईल वरून संपर्क साधून माहिती देत त्यांना घटनास्थळी पाचारण केले. यावेळी झिराड येथील सर्पमित्र रुपेश गुरव, किहीम येथील सर्पमित्र तुषार चव्हाण, भाल येथील सर्पमित्र नीरज दळवी या सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने तब्बल 7 फूट लांब व अंदाजे 15 किलो पेक्षा जास्त वजनाच्या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी घेऊन गेले. एवढया मोठ्या पकडलेल्या अजगराला पाहण्यासाठी परिसरातील लहानांसह महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.