जिल्हापुरवठा अधिकारी कार्यालयाचा दावा
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील शिधाधारकांना सध्या गुणसंवर्धीत तांदुळ वितरीत केला जात आहे. मात्र तो प्लास्टीकचा तांदुळ असल्याची ओरड सुरु झाली आहे. ही भीती अनाठायी असून कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी हे तांदुळ दिले जात आहेत, असा दावा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेद्वारे जिल्ह्यातील 17 लाख 50 हजार लाभार्थ्यांना जानेवारीपासून मोफत धान्य दिले जात आहे. रायगड जिल्ह्यात एक हजार 440 रास्तभाव दुकाने आहेत. ऑक्टोबर महिन्यात येत असलेला तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याने तो प्लास्टीकचा असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मुरुड, श्रीवर्धन व अलिबागमधील शिधाधारकांकडून याबाबत तक्रारी आल्या होत्या. परंतु कुषोषणाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने शिधाधारकांना गुणसंवर्धीत तांदुळ (फोर्टिफाईड राईस) देण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य तांदळापेक्षा त्यात लोह, व्हिटॅमिन बी -12 ,सुक्ष्म अन्नद्रव्ये आदी पोषणतत्वे अधिक आहेत. पावडरपासून तयार करण्यात आलेल्या या तांदळाला प्रति क्विंटल 73 रुपये अतिरिक्त खर्च आहे. कुपोषणाला नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टीने सरकारने त्यांचे वितरण केले आहेत. त्यामुळे धान्य प्लास्टीकचे नसून नागरिकांनी याबाबत संभ्रम बाळगू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
