तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह विद्यमान पोलीस निरीक्षकांचा समावेश
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बनावट कॉल सेंटरद्वारे परदेशातील लोकांना विविध आमिषे दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गंडा घालण्यात आला होता. सायबर यंत्रणेला डिजिटल ट्रॅकिंगच्या माध्यमातून आयपी ॲड्रेस शोधण्यात यश आले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी व विद्यमान पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे हे दोघे सीबीआयच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. लवकरच हे प्रकरण अधिक उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये फेक कॉल सेंटर चालविली जात होती. कॅनडा, यूएसए या देशातील नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी यूएसएच्या सुरक्षा यंत्रणेने माहिती घेऊन त्यांचे आयपी नंबर शोधून काढले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील तत्कालीन पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी व विद्यमान पोलीस निरीक्षकांचा समावेश असल्याची माहिती उघड झाली आहे. फेक कॉल सेंटरला चालविण्यास अर्थपूर्ण पाठबळ असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाला दुजोरा देणाऱ्या अधिकाऱ्यांची लवकरच तपासणी केली जाणार आहे. सीबीआयच्या माध्यमातून त्यांनी चौकशी केली जाणार असल्याची चर्चा सध्या पोलीस दलात सुरु आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक सीबीआयच्या रडारवर आहेत. लवकरच त्यांना नोटीसा बजावल्या जाणार असल्याची चर्चा आहे.






