बहुप्रतिक्षेनंतर प्रवासी वाहतूक सुरू; स्थानिकांसह पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी
| नेरळ | प्रतिनिधी |
पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन गुरुवारी, सहा नोव्हेंबरपासून पर्यटक प्रवाशांच्या दिमतीस आली. नेरळ-माथेरान-नेरळ या पहिल्या गाडीला पर्यटकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला. मात्र, वातानुकूलित गारेगार प्रवास करण्यासाठी जोडण्यात आलेला विस्टाडोम डब्बा मात्र पूर्णपणे रिकामा राहिला. दरम्यान, या पहिल्या प्रवासी गाडीला स्थानक प्रबंधक यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्याआधी रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांनी गाडीची भंडारा उधळून पूजाअर्चा केली.
नेरळ येथून माथेरानसाठी मिनीट्रेन सोडली जाते. नेरळ जंक्शन स्थानकातून 1907 मध्ये मिनीट्रेन सुरू झाली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने दरवर्षी 15 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीत नेरळ-माथेरान मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाते. यावर्षी मे महिन्यात पाऊस आला आणि 15 जून रोजी पावसाळा अपेक्षित धरून बंद होणारी मिनीट्रेन 26 मेपासून बंद करण्यात आली. त्यानंतर मोसमी पाऊस लांबला आणि 15 ऑक्टोबर रोजी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन पुन्हा आपला प्रवास सुरू करू शकली नव्हती. अजूनही सरता पाऊस सुरू असताना पर्यटक प्रवासी वर्गाची प्रचंड मागणी असल्याने मिनीट्रेनचे नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर मालवाहू गाड्यांची चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीमध्ये 28 ऑक्टोबर रोजी नेरळ येथून निघालेली मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा मालवाहू गाडी दोन नोव्हेंबरसाठी पाठवण्यात आली आणि या मालवाहू गाडीचा प्रवास सुखरूप झाल्यानंतर नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवास सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेऊन गुरुवारी प्रवासी गाडी सुरू केली. तब्बल 20 दिवस उशिरा मिनीट्रेन सुरू झाली आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले होते.
नेरळ येथून सहा प्रवासी डब्बे लावलेली पावसाळ्यानंतरच्या हंगामातील पहिली मिनीट्रेन माथेरानसाठी रवाना झाली. त्याआधी नेरळ स्थानकात या गाडीच्या इंजिनची पूजा करण्यात आली. या पहिल्या गाडीचे सारथ्य अनुभवी चालक हरीश चिंचोळे यांनी केले, तर त्यांना सहाय्यक म्हणून मुकेश योगी यांनी साथ दिली. या गाडीचे गार्ड म्हणून हरदेव मीना, तर तिकीट तपासनीस भगत हे होते. पहिल्या गाडीमधील द्वितीय श्रेणीची सर्व 90 तिकिटे संपली, तसेच प्रथम श्रेणीची 22 तिकिटे तिकीट खिडकी उघडल्यावर काही मिनिटात संपली. पहिली तिकीट दहा जणांच्या ग्रुपने मिळविली असून, या गाडीसाठी लावण्यात आलेला वातानुकूलित डब्बा मात्र रिकामा राहिला. या पहिल्या गाडीला प्रभारी स्थानक प्रबंधक धीरेंद्र सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी स्थानक प्रबंधक पाटील, वाहतूक निरीक्षक अनुप कुमार सिंह, मुख्य तिकीट निरीक्षक जे.जी. विनोद, बिर्जन कुमार तर बुकिंग क्लार्क योगेंद्र राजावत, प्रेम चंद ऑड यांनी काम पाहिले. दरम्यान, या रेल्वे मार्गाची देखभाल ठेवणारे कनिष्ठ अभियंता सानप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाडी सुरू करण्यात आली.
असा असेल प्रवास!
नेरळ येथून सकाळी मालवाहू गाडी सोडली जाणार आहे. त्यानंतर नऊ वाजता पहिली, तर साडेदहा वाजता दुसरी प्रवासी गाडी नेरळ येथून माथेरानसाठी सोडली जाणार आहे. माथेरान येथून नेरळसाठी पहिली गाडी पावणे दोन वाजता आणि दुसरी गाडी चार वाजतासाठी रवाना होणार आहे. त्या दोन्ही फेऱ्यांचा कार्यक्रम मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन गाड्या वाढवून देण्याची अनेक वर्षांची मागणी आताही प्रलंबित आहे. मात्र, माथेरान ते अमन लॉज यादरम्यान शटल सेवा पूर्वीसारखी सुरू राहणार आहे.
असे असेल वेळापत्रक
नेरळ येथून माथेरानसाठी
सकाळी 08.50
सकाळी 10.25
माथेरान येथे पोहोचणार..
सकाळी 11.30
दुपारी 01.05
माथेरान येथून नेरळसाठी..
दुपारी 02.45
दुपारी 04.00
नेरळ येथे पोहचणार..
सायंकाळी.05.30
सायंकाळी 06.40







