यंदा आठ दिवस आधीच मिनीट्रेन पावसाळी सुट्टीवर
| नेरळ | वार्ताहर |
पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन पर्यटनाच्या गर्दीने ओसंडून वाहणार आहे. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने आज नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, यंदा आठ दिवस आधीच मिनीट्रेनचा प्रवास थांबणार आहे. दरम्यान, आज आठ जूनपासून मिनीट्रेन पावसाळी सुट्टीवर जात असून, 15 ऑक्टोबरपासून पुन्हा ती सुरू होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिली आहे.
ब्रिटिश काळात सुरू झालेली मिनीट्रेन दरवर्षी 15 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीत बंद ठेवली जाते. पर्वतीय रेल्वे मार्ग असल्याने पावसाचा प्रचंड वेग आणि सततचा पाऊस यामुळे दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने मिनीट्रेन बंद असते. मात्र, यावर्षी मिनीट्रेन आठ दिवस आधीच म्हणजे आठ जूनपासून पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. सध्या माथेरानमध्ये पर्यटन हंगाम असून, पर्यटकांची हजारोंची गर्दी माथेरानमध्ये आहे. असे असताना मध्य रेल्वे प्रशासनाने हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज नेरळ माथेरान नेरळ मार्गावर चालविली जाणारी प्रवासी वाहतूक या हंगामातील शेवटची ट्रेन असणार आहे. सध्या सर्वत्र कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी माथेरान शहरात आहे. त्यात माथेरान आणि मिनीट्रेन हे मोठे समीकरण असून, मिनी ट्रेनची सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने त्याचा थेट परिणाम माथेरानचे पर्यटन व्यवसायावर होणार आहे.
गतवर्षी मिनी ट्रेनची सेवा 10 जून रोजी स्थगित करण्यात आली होती. तर पावसाळी हंगाम 15 ऑक्टोबर रोजी सुरू होण्याची अपेक्षा असताना 24 डिसेंबर 2023 रोजी मिनी ट्रेनची वाहतूक सेवा दोन महिने उशिरा सुरू झाली होती. यावर्षीदेखील आठ दिवस आधीच मिनी ट्रेनची प्रवासी वाहतूक बंद करण्यात येत आहे. सध्या कर्जत, नेरळ, माथेरान येथे कडक उन असून उष्यामुळे अंगाची लाहीलाही सुरू आहे आणि असे असताना हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवासी पर्यटक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, या काळात नेरळ माथेरान मार्गावरील शटल सेवा कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहणार आहे. अमन लॉज ते माथेरान या दरम्यान मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू असते आणि त्या शटल सेवेच्या फेर्या पावसाळ्यातदेखील कायम ठेवण्यात येणार आहे. नेरळ माथेरान नेरळ मार्गावर प्रवासी वाहतूक बंद असली तरी नेरळ येथून दररोज मालवाहू गाडी सकाळी साडेआठ वाजता माथेरान अमन लॉज येथे सोडली जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने प्रसारित केलेल्या पत्रकातून दिली आहे.
सध्या पाऊस नाही आणि पाऊस सुरू होण्याची चिन्हेदेखील नाहीत. तरीदेखील रेल्वेकडून नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय चुकीचा असून, 15 जूनपर्यंत गाडी सुरू ठेवली पाहिजे आणि 15 ऑक्टोबरऐवजी एक ऑक्टोबरपासून मिनीट्रेन सुरु झाली पाहिजे.
जनार्दन पारटे,
सामाजिक कार्यकर्ते
शटल सेवेचे वेळापत्रक माथेरान येथून अमन लॉजकरिता 08.20,09.10,11.35,02.00,03.15,05.20 शनिवार रविवार 10.05,01.10
अमन लॉज स्थानकातून माथेरान करिता
08.45,09.35,12.00,.02.45,03.40,05.45
शनिवार रविवार
10.30,01.35