कोळशाच्या इंजिनप्रमाणेच नवे डिझेल इंजिन
| कर्जत | प्रतिनिधी |
जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानची राणी पर्यटकांचे आकर्षण आहे. या मिनिट्रेनला मध्य रेल्वेकडून लवकर आकर्षक असे नवीन स्वरूपात कोळशाच्या इंजिनचा लूक असलेले डिझेलवर चालणारे नवीन इंजिन मिळणार आहे. नवा लूक असलेल्या या इंजिनच्या गाडीतून प्रवास करणे म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच म्हणावी लागेल.
सुमारे सत्तर वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने माथेरानच्या गाडीच्या ताफ्यात नवीन कोळशावर चालणारी स्टीम इंजिन बनवली. माथेरानचे आकर्षण असणारी ही कोळशावर चालणारी स्टीम इंजिन घाटातून जाताना अनेक ठिकाणी कोळशाच्या ठिणग्या उडून आजूबाजूचे गवत जळत असे, तर 1977 आसपास या इंजिनातून निघालेल्या कोळशाच्या ठिणग्यांमुळे जुम्मापट्टीजवळ काही घरांना आग लागली होती. त्यानंतर हे इंजिन चालण्यावर आक्षेप घेण्यात आला. तर, इंजिनसाठी कोळसादेखील मिळेनासा झाला. यावर मध्य रेल्वेकडून 20 सप्टेंबर 1982 साली माथेरानसह महाराष्ट्रातील वाफेवर चालणारी इंजिन्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या इंजिनाची येणार्या पर्यटकांना ओळख राहावी याकरिता जुने वाफेचे इंजिन माथेरान येथे ठेवण्यात आले; परंतु अशाच प्रकारे नवीन स्वरूपात इंजिन असावे याकरिता मध्य रेल्वेकडे विचारणा होऊ लागली. यावर मध्य रेल्वेकडून यावर विचार करून नवीन स्वरूपात डिझेलवर चालणार्या मात्र वाफेच्या इंजिनाचा लूक असलेल्या इंजिनची निर्मिती परळ लोके शेडमध्ये केली असून, साधारण जून महिन्यात हे इंजिन माथेरान रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली.
या इंजिनाची रचना वाफेच्या इंजिनसारखी असून, यातून शिट्टीदेखील वाफेवर वाजणारी फुसफुसणारी असेल, तर या इंजिनाला हेरिटेज लूक देण्यात आला असून, यापासून पर्यावरणास कुठलीही बाधा होणार नाही. हे इंजिन परळ लोकेशेडमध्ये असून, ते लवकरच रस्तामार्गे नेरळ येथे आणून त्याची जोडणी केली जाणार आहे. हे इंजिन पूर्णपणे सुरक्षित आहे, तर माथेरानचर घाट पूर्ण क्षमतेने चढेल, असेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.