वेलचीच्या दरात 15 दिवसांत किलोमागे 1,000रुपयांची वाढ
| पनवेल | प्रतिनिधी ।
सणासुदीच्या दिवसांची चाहूल लागताच स्वयंपाकघरातील विविध वस्तूंच्या दरात वाढ होत असते. यंदा मात्र ‘मसाल्याची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेलचीच्या दराने उच्चांक गाठला आहे. अवघ्या 15 दिवसांत वेलचीच्या दरात किलोमागे तब्बल 1,000 रुपयांची वाढ झाली असून, 3,400 रुपये किलो असलेली वेलची आता 4,400 रुपयांवर पोहोचली आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांसह मिठाई व्यावसायिकांनाही बसत आहे.
भारतीय खाद्यसंस्कृतीत वेलचीला विशेष महत्त्व आहे. मिठाई, खीर, शिरा, लाडू, नारळी पाक, मोदक, बासुंदी, चहा तसेच विविध मसाल्यांमध्ये वेलचीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विशेषतः रक्षाबंधन, हरतालिका, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि लग्नसराईच्या काळात वेलचीची मागणी वाढते.
उत्पादन घटल्याचा परिणाम
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, देशातील वेलचीच्या उत्पादनात केरळचा मोठा वाटा आहे. मात्र, गेल्या वर्षी प्रतिकूल हवामान, अवकाळी पाऊस आणि अन्य नैसर्गिक कारणांमुळे उत्पादनात घट झाली. त्यातच दर्जेदार वेलचीचे प्रमाण कमी झाल्याने बाजारात चांगल्या गुणवत्तेच्या वेलचीचा तुटवडा जाणवत आहे. उपलब्ध साठ्यावर वाढता ताण आणि मागणीच्या तुलनेत मर्यादित पुरवठा यामुळे दरात सातत्याने वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
तोळ्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही फटका
सामान्य ग्राहकांकडून वेलचीची खरेदी किलोने न करता तोळ्याने केली जाते. घरगुती वापरासाठी काही तोळे वेलची घेणाऱ्या ग्राहकांना आता तोळ्यामागे सुमारे 40 ते 50 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे मुखशुद्धीपासून मिठाई आणि विविध घरगुती पदार्थांपर्यंत सर्वच बाबींवर या दरवाढीचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मिठाई उत्पादकांचे गणित बिघडले
सणासुदीच्या काळात तयार होणाऱ्या मिठाईमध्ये वेलचीचा सुगंध आणि चव महत्त्वाची असते. मात्र दरवाढ अशीच सुरू राहिल्यास उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मिठाई उत्पादकांना वेलचीचा वापर मर्यादित करावा लागू शकतो. परिणामी पारंपरिक मिठाईच्या चवीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेलचीची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात वेलचीच्या दरात आणखी तेजी येण्याचा अंदाज व्यापारी वर्तुळातून व्यक्त होत आहे. सणासुदीच्या उत्साहात आता महागाईचे सावटही गडद होताना दिसत आहे.
