। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी एक तरुण डोंगरातील कपारीत अडकला. डोंगरावर जाण्यास तसेच खाली उतरण्यास मार्ग नसल्याने तो काही काळ धोकादायक परिस्थितीत अडकून पडला होता. अखेर खारघर अग्निशमन केंद्रातील जवानांनी धाडसी बचावकार्य करत या तरुणाची सुखरूप सुटका केली.
खारघरमधील गोल्फ कोर्सजवळील डोंगरावरील कपारीत तरुण अडकल्याची माहिती खारघर अग्निशमन केंद्राला मिळताच अग्निशमन दल अधिकारी आशिष दळवी तसेच फायरमन सुरज पाटील, अजय वाघ, प्रीतम पाटील, निलेश मढवी आणि के. वाय. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पावसामुळे डोंगरावरील परिसर निसरडा झाला होता. त्यातच सतत पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले. मात्र, जवानांनी परिस्थितीची पर्वा न करता दोरीच्या साहाय्याने कपारीपर्यंत उतरून अडकलेल्या तरुणाला सुरक्षितपणे दोरीने बांधले आणि त्याला वर खेचून आणले. या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. संबंधित तरुण खारघर सेक्टर-३४ येथील असल्याचे समजते.
धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन
पावसाळ्यात खारघर डोंगरावरील धबधबे आणि ट्रेकिंगची ठिकाणे अत्यंत धोकादायक बनतात. अशा ठिकाणी जाण्यास बंदी असतानाही सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि आकर्षणामुळे अनेक तरुण जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येते. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही तरुणांचा डोंगराकडे जाण्याचा ओघ कमी होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात डोंगर आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे. विशेषतः तरुणांनी पावसाळा संपेपर्यंत अशा धोकादायक ठिकाणी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन फायरमन सुरज पाटील यांनी केले आहे.







