एमएसआयडीसीच्या कामावर प्रश्नचिन्ह

कुरूळ ते बेलकडे फाट्यापर्यंत खोदाई; रस्ता खचण्याची अन्‌‍ खड्डे पडण्याची भीती

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग-रोहा मार्गावरील एमएसआयडीसीच्या रस्त्यांच्या निकृष्ट कामाचा अनुभव ताजा असतानाच कुरूळ तलाव ते बेलकडे फाट्यापर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीच्या काँक्रिटीकरणासाठी दीड ते दोन फूट खोदाई केली जात होती. मात्र, सध्याच्या कामात अपेक्षित खोलीकरण दिसत नसल्याने रस्ता पुन्हा खचण्याची आणि खड्डे पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे एमएसआयडीसी नेमके कोणत्या दर्जाचे काम करत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील बेलकडे ते सहाणपर्यंतच्या रस्त्याचे काम एमएसआयडीसीने केले होते. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच काँक्रिट रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले. अखेर विभागाला रस्ता फोडून पुन्हा काम करण्याची वेळ आली. आता शिल्लक असलेल्या कुरूळ तलाव ते बेलकडे फाटा या मार्गाचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. खोदाई करून खडीकरण केले जात असले तरी खोलीकरण कमी असल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे. तसेच, या कामामुळे वाहतूक कोंडीचाही त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेलकडे ते कुरूळ हा रस्ता अरुंद असून, वाहनांची वर्दळ मोठी आहे. अधिक खोलीकरण केल्यास कामाला विलंब होऊन नागरिकांना अधिक दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. त्यामुळे खोदाई कमी केली आहे. मात्र, सर्व्हेक्षणानुसारच काम सुरू असून, पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवाळीत वाहतूक कोंडीचा फटका
दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आली असून, खरेदीसाठी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गावी येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. अशातच ऐन सणासुदीत कुरूळ ते बेलकडे फाटा रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. दिवाळीत अलिबागसह नागाव, मुरूड, रेवदंडा आणि आक्षी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. याच मार्गावरून पर्यटकांची वाहतूक होणार असल्याने रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
Exit mobile version