उरणमध्ये डंपिंग ग्राऊंडचा प्रश्‍न ऐरणीवर

कार्यालय परिसरात अस्वच्छता
। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिकेला कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राऊंडची सोय नसल्याकारणाने सध्या नगरपालिका कार्यालय परिसरातील जागा डंपिंग ग्राऊंड बनली आहे. या ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे त्याठिकाणी दुर्गंधी व माशा-डास यांचे साम्राज्य पसरले आहे. याला नगरपालिका आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांनी दुजोरा दिला असून आपण कचर्‍याच्या ठिकाणी पावडरची फवारणी करीत असल्याचे सांगितले.
गेली अनेक वर्षांपासून उरण नगरपालिकेला डंपिंग ग्राऊंड नव्हते. शहराचा कचरा हा हनुमान कोळीवाडा नजीक असलेल्या समुद्र किनारी टाकला जात होता. परंतु हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने ही सदर ठिकाणी कचरा टाकण्यास नगरपालिकेला मनाई केली. त्यामुळे शहरात गोळा होणारा कचर्‍याची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्‍न नगरपालिकेपुढे उभा राहिला होता. नगरपालिकेने शहरातील गोळा होणारा कचरा नगरपालिकेच्या परिसरातील एका ठिकाणी डंप करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी बरोबर माशा व डास यांचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांना होत आहे. याबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. मुख्याधिकारी संतोष माळी हे एखादे मैदान स्वच्छ केल्यानंतर त्यांचे फोटो व्हायरल करतात मग शहरातील जनतेला भेडसावणार्‍या समस्या व डंपिंग ग्राऊंडच्या प्रश्‍नाबाबत जागृत राहून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले तर जास्त बरे होईल अशी चर्चा शहरातील नागरिकांत सुरू आहे. गेली अनेक वर्षांपासून डंपिंग ग्राऊंडचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे दिसत नसल्यानेच डंपिंग ग्राऊंडचे घोंगडे आजतागायत भिजत पडले आहे. याबाबत नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. विमानतळ असल्याकारणाने न्यायालयाने डंपिंग ग्राऊंड परवानगी दिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर कचरा हा नगरपालिका कार्यालयातील एका जागी गोळा करून ओला व सुका कचरा या विलगीकरण केले जाते. या कचर्‍याासून बायोगॅसची निर्मिती केली जाते. तसेच जो कचरा उपयुक्त नाही असा कचरा या परिसरात न टाकता नगरपालिका तळोजा येथील चाल गावानजीक वाहून नेण्यासाठी दोन डंपर आहेत. तसेच दुर्गंधी पसरू नये यासाठी जतूंनाशक पावडर फवारणी केली जात असल्याचे तेजी यांनी सांगितले.

Exit mobile version