। पाली/बेणसे । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी एक प्रसिद्ध असलेल्या पाली बल्लाळेश्वर मंदिरात संकष्टी चतुर्थीला गुरुवारी (दि.6) पहाटे पासून बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मुसळधार पावसातही भक्तांनी बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी ऊन, वारा, वादळ , पाऊस आदी कोणत्याही परिस्थितीत भाविक भक्तगण आवर्जून पालीत येत असतात. संकष्टीला पालीत भाविक सकाळपासून च हजर राहून मनोभावे दर्शन घेत होते.
भाविकांची मोठी गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिक यांचा धंदा देखील तेजीत होता. परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले होते. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आरोचे शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यल्प दरात प्रसाद उपलब्ध आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. प्रसादालय खुले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली
जोरदार पाऊस असूनही संकष्टी चतुर्थीला मोठ्या प्रमाणात भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला झाला.
मनोज मोरे, व्यावसाईक, बल्लाळेश्वर देवस्थान