महागणपतीच्या दर्शनासाठी रांगा

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील चिरनेर महागणपतीच्या मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेशभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी नवविवाहित जोडप्यांसह अन्य भाविकांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. पेशव्यांच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गणेशाची मंदिरे उभारण्यात आली. चिरनेर येथील गणपतीच्या मंदिराची निर्मिती पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीत झाल्याची नोंद आहे. चिरनेर येथील गणपती मंदिर हे हेमाडपंथीय धाटणीचे दिसून येते. हे गणपती देवस्थान अत्यंत जागृत असून, या ठिकाणी आलेल्या भक्तांची दुःखे निश्‍चित दूर होतात, अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे.

सुट्टीच्या दिवशी रविवारी (दि. 26) संकष्टी चतुर्थी आल्याने मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. उरण तालुक्यातील भक्तांबरोबर पनवेल, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, मुंबई, पेण या शहरातील हजारो भाविकांनी कुटुंबासह महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत होते. येणार्‍या भाविकांसह पर्यटकांना वाढत्या उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, सदस्य विशेष मेहनत घेत होते.

Exit mobile version