| पाली | प्रतिनिधी |
येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. अब की बार 400 पार खासदार या पंतप्रधान मोर्दीच्या संकल्पपूर्तीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी फिरत आहेत. राज्यातही जागावाटपाची खल सुरू आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनिल तटकरे व भाजपचे धैर्यशील पाटील या दोघांनीही दावा केला आहे. त्यामुळे त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. सध्या जिल्ह्यात दोन्ही मित्रपक्ष आमने-सामने असून ऐकमेकांची उणी धुणी काढण्याचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
एकीकडे महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात आहे. तसेच जागावाटपही जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगून मिशन 45 प्लससाठी मैदानात उतरण्याची भाषाही सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात जागेवरून दावे-प्रतिदावे सुरू असल्याने जागावाटपाचा वाद शेवटच्या क्षणापर्यंत ताणला जाण्याची शक्यता आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनिल तटकरे विद्यमान खासदार आहेत. मात्र, तेथे भाजपने दावा केला आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात वर्चस्व दाखविण्यासाठी आता महायुतीतच मित्र पक्षावार आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु आहे.
सुनिल तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असून ते रायगड मतदारसंघात अडकून पडलेत. त्यांनी आता मतदारसंघातून बाहेर पडावे व राज्यात महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. धैर्यशील पाटील हा मतदारसंघ सांभाळण्यासाठी सक्षम आहे. सुनील तटकरे सर्वच पदे तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवीत? असा सवाल भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी विचारत तटकरेंना भर सभेत डिवचलं.
32 रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी आमदार धैर्यशील पाटील यांना मिळालीच पाहिजे यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचे जोरदार मेळावे पार पडत आहेत. पेण, सुधागड मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा पालीत शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. एका बाजूला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, विद्यमान खासदार सुनिल तटकरे हे देखील रायगड लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत, तर याच मतदारसंघात लोकसभा लढविण्यासाठी धैर्यशील पाटील हे देखील गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे एकीकडे निवडणुकीची तयारी सुरू झालेली असतानाच मतदारसंघातील बेबनाव महायुतीची डोकेदुखी वाढविण्याची शक्यता आहे.