| हमरापूर | वार्ताहर |
पेण तालुक्यातील तांबडशेत गावचे निवृत्त माध्यमिक शिक्षक आर. के. पाटील सरांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती मिळतात सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि पाटील परिवार आहे. गेल्या वर्षी ते शिक्षकी पेशातून निवृत्त झाले होते. आ. जयंत पाटील यांचे ते खास कार्यकर्ते होते. त्यांनी सेझ प्रकल्प, गेल इंडिया वायू वाहिनी प्रकल्प, एमएमआरडीए अधिसूचना, नवनगर प्रकल्पाविरोधात हरकती याबाबत शेतकर्यांमध्ये जनजागृती केली होती. हमरापूर विभागातील शेतकर्यांना योग्य दिशा देणारा मार्गदर्शक हरपला अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.