| नवी दिल्ली | वार्ताहर |
टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत भारतीय ग्रँड मास्टर आर. प्रज्ञानंदने चमकदार कामगिरी करत विश्वविजेचा डिंग लिरेनचा पराभव केला. चौथ्या फेरीत त्याला प्रज्ञानंदने पराभूत केले. या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले आहे. तो नंबर-1 भारतीय ग्रँड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षीही याच स्पर्धेत डिंगचा पराभव केला होता. या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला रेटिंगच्या बाबतीत मागे टाकले आहे. त्याचे 2748.3 गुण आहेत. तर विश्वनाथन आनंद 12 व्या क्रमांकावर आहे. आनंदचे 2748.0 गुण आहेत. या यादीत मॅग्नस कार्लसन अव्वल स्थानावर आहे. फॅबियानो कारुआना दुसर्या स्थानावर आहे.
भारतीय ग्रँड मास्टर आर. प्रज्ञानंदच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. 2016 मध्ये तो सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. वयाच्या अवघ्या 10 वर्षे 10 महिन्यांत आर. प्रज्ञानंदनी ही कामगिरी केली होती. 2017 मध्ये तो पहिल्यांदा ग्रँड मास्टर झाला. आर. प्रज्ञानंद चेन्नई, तामिळनाडू येथील आहे. त्याचा जन्म 2005 मध्ये झाला होता. त्याचे वडील रमेशबाबू बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.