| रत्नागिरी | प्रतिनिधी |
नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा सरला तरी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्यांनी अद्याप म्हणावा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात एकूण सरासरी सहा हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामच्या पेरण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत रब्बीचा एकूण पेरा 4.76 टक्क्यांवर पोहोचला आहे. केवळ 243 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. ऊसपिकासह 259.35 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कुळीथ, संकरित, पावटा, मका, कडधान्य यासह विविध पिकांची पेरणी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग सहा महिने पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. भात शेती हातातून गेली. यंदा भात पिकाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झाल्याने यंदा रब्बी हंगाम लांबला आहे. खरीपाचे कामे अद्याप पूर्ण झाली नाही. ज्यांचे झाले आहे अशा शेतकऱ्यांनी शेतातील नांगरणी केलेली असून कडधान्यासह पालेभाज्यांची पेरणी पूर्ण झालेली आहे.







