अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांपुढील संकट कायम
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भात, नाचणी पिकांची पेरणी करण्यात आली असून काही पिके वाहून गेली, तर काही पिके कापणी करून झोडणी, मळणी करण्याच्या काम पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगामच्या पेरण्यांना उशीर होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षी 5 हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अद्याप रब्बीची तयारी सुरू झालेली नसून कृषी विभागाच्या वतीने बियाणे, खत वितरण करण्यासाठी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरिपाच्या भात शेतीला पावसाचा वारंवार फटका बसला आहे. अशा परिस्थितीत भात पिके चांगल्याप्रकारे आली होती. मात्र अवकाळी पावसामुळे 170 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे हळव्या भात पिकाची उत्पादकता घटली आहे. मात्र गरवे, निमगरवे भात पीक उत्तम आहे, परंतु तयार पीक कापणीसाठी पावसाचा अडसर निर्माण झाला आहे. कापलेले भात वाळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट आले आहे.
दरम्यान, रब्बी हंगामला उशीर होणार असून पेरणीला वेळ लागणार असल्याचे चित्र आहे. रब्बीच्या हंगामात शेतकरी कुळीथ, संकरित, मका, पावटा, कडधान्य यासारख्या विविध प्रकारच्या भाज्यांच्या बियांणाची पेरणी करीत असतो. भात पिकांची कापणी, झोडणी झाल्यानंतर नांगरणी करून बियाणे पेरणी करणार असून त्यासाठी आणखी काही दिवस जाण्याची शक्यता आहे. खरीप पिके गेली आता रब्बी पिके तारणार का, असा प्रश्न कोकणातील शेतकऱ्यांसमोर आहे.
