बळीराजावरील संकट टळेना; पिकांचे अतोनात नुकसान
| ठाणे | प्रतिनिधी |
ठाणे जिल्ह्यात रविवारी (दि.26) पुन्हा अवकाळी पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरासह, भिवंडी, शहापूरच्या ग्रामीण भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. रविवारी देखील ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. दरम्यान मागील आठवड्या भरापासून होणारा मुसळधार अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांचा मेघगर्जनेमुळे बळीराजा पुरता संकटात सापडला आहे.
दिवसभराच्या लाहीनंतर शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शहापूर तालुक्यासह ग्रामीण भागाला तडाखा दिला. पिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा उद्धवस्त. उभी पिके आडवी झाली. ‘राब राब राबून’ काळ्या मातीत पिकवलले सोने शेतातच मातीमोल होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, हातातोंडाशी आलेला घास ही हिरावला गेल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसामुळे शेतातील उभी पिके आडवी तर झालीच आहेत, परंतु, पाण्याखाली जाऊन कुजली आहेत. अनेक ठिकाणी भात पिकांना मोड आल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीची लागवड केली जाते. भात पीक हेच येथील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असून, खरिप हंगामातील या पिकाला दरवर्षी निसर्गाच्या अवकृपेचा फटका बसत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेला पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. सणासुदीत अवकाळी पावसाने शहापूर तालुक्यातील भातपिकांना झोडपून काढल्याने ऐन दिवाळीत बळीराजाचे दिवाळे निघाले आहे. कष्ट करून काळ्या मातीत पिकवलेले सोन्यासारखे भात पीक कापण्याआधीच संकटात आले होते. त्यातच शनिवारी सायंकाळी शहापूर तालुक्यासह शेणवा, किन्हवली, डोळखांब, कसारा, खर्डी, चोंढे, साकडबाव आधी ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. शहापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे 33 टक्केच्या वर नुकसान झालेली भात पिके व शेतजमिनीच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवला असून, 11175 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
शासनाकडून तुटपुंजी मदत
सप्टेंबर महिना अखेरीस अनेक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या भातालाही काही अंशी अतिवृष्टीचा फटका बसला. त्या अनुषंगाने शहापुरात नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. मात्र, नुकसानीच्या बदल्यात शासनाकडून प्रति गुंठा 85 रुपयाप्रमाणे तुटपुंजी नुकसान भरपाई दिल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.







