दहिवलीमध्ये प्रचार संपल्यानंतर राडा

शिंदे गट,मविआ कार्यकत्यांमध्ये हाणामारी
| नेरळ | प्रतिनिधी |
दहीवली ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एकमेकांची डोकी फोडण्यात आल्याचे दिसून येत आहे.दहिवलीतर्फे वरेडी या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने रात्री 11 वाजता प्रचार संपला असताना शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाल्याने तणाव निर्माण झाला.

कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी उद्या 18 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदार होणार आहे. तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी नेरळ येथील दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.थेटसरपंच पदाच्या निवडणुकीत होत असलेली चुरस पाहता रिंगणात शिंदे शिवसेना गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय असलेले अमर मिसाळ यांची पत्नी मेघा मिसाळ ही निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून येथील माजी सरपंच चिंदू तरे यांची नातलग नेत्रा तरे ही उच्च शिक्षित महिला ही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

शुक्रवार 16 डिसेंबर रोजी शेवटचा प्रचार दिवस संपल्याने राजकीय पुढार्‍यांनी आता मतदारांना गुपचूप रात्री गाठण्याचा प्रयत्न सुरू केले होते. या दरम्यान रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिंदे शिवसेना गटातील कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने सुरुवातीला किरकोळ वादावरून नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये परस्पर कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत,तर मारहाण करताना फावडा-टिकावच्या दांडक्यांचा तर लोखंडी रॉडचा वापर केला असल्याचे जखमी कार्यकर्ते सांगत आहेत. महाविकास आघाडीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार असलेले नेत्रा तरे यांचे पती निलेश तरे यांच्यावर अमर मिसाळ यांनी जीवघेणा हल्ला केला त्यात डोक्यावर जबर मार लागला असल्याचा आरोप तरे यांनी केला आहे. सोबत चार ते पाच जणांना मिसाळ यांच्या सोबत आलेल्या तरुणांनी मारहाण केली असल्याचे देखील सांगितले.

दोन गटात झालेल्या या हाणामारीमुळे नेरळ पोलीस ठाण्यात एकमेकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याने गावात देखील तणावाचे वातावरण पसरले आहे. येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने गावाला आता छावणीचे रूप आलेले दिसून येत आहे. दहीवली गावात रात्रीपासून पोलिसांच्या दोन गाड्या उभ्या असून तेथे निवडणूक मध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसणार आहे.

Exit mobile version