| अलिबाग | प्रतिनिधी |
अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छिमार, बागायतदार यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची पडझड होऊन वित्तहानी झाली आहे. सरकारने जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत आणि तातडीने भरपाई देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी शेकाप राज्य मीडिया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी, बागायतदार, मच्छिमार, तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, त्यांना अद्याप सरकारसह प्रशासनाकडून मदतीचा हात देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या न्याय्य हक्कासाठी अलिबाग येथील शेकाप भवन येथे गुरुवारी (दि.5) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेतकरी संघ अलिबाग तालुका अध्यक्ष अनिल गोमा पाटील, शेकाप मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष परशुराम गजने, पी.डी. कटोर, शेकाप अलिबाग तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकरी, बागायतदार व मच्छिमार यांचे खूप मोठे नुकसान झाले. पावसाळी भातपीक लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. अवकाळी पावसामुळे भातपिकांसह आंबा, काजू व इतर पिकांची मोठी हानी झाली. वादळी वाऱ्यामुळे दोनशेहून अधिक घरांची पडझड झाली. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील धान्य, विद्युत उपकरणे भिजून नुकसान झाले. पूरसदृश्य परिस्थितीमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर जिल्ह्यात पेरणीची कामे केली जातात. परंतु, अवकाळी पावसात शेते पाण्याने भरली. अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे भातपेरणी करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रो पेरणी करावी लागणार आहे. त्याचा 50 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खारेपाटातील शेतकऱ्यांही त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावीत.
तसेच, मे महिन्यामध्ये पंधरा ते वीस दिवस वादळी पाऊस झाला. या पावसामुळे मासेमारीवर बंदी घालण्यात आली. मच्छिमारांवर मासेमारीचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. सुक्या मासळीचे नुकसान झाले. त्यामुळे मच्छिमारांची खूप मोठी हानी झाली आहे. शेतकरी, मच्छिमारांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई देण्यासाठी पावले उचलण्यात यावी, अशी शेकापच्यावतीने मागणी करण्यात येत असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
मंत्री, आमदारांना मच्छिमार, शेतकऱ्यांचा विसरः ॲड. मानसी म्हात्रे
जिल्ह्यात अनेक घटक वंचित आहेत. स्त्री सुरक्षेबरोबरच रस्ता, पाणी, आरोग्य असे अनेक प्रश्न जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत. कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील मार्ग खडतर आहे. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था बिकट आहे. अवकाळी पावसात मच्छिमार, शेतकरी, बागायतदारांचे खूप मोठे नुकसान झाले. या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री, आमदार असताना शेतकरी, मच्छिमारांच्या प्रश्नावर बोलत नाहीत, हे रायगडचे दुर्दैव आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम शेकापने केले आहेत. मच्छिमार, शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध झाला पाहिजे. या भूमिकेतून शेकाप पुढील लढा देणार आहे, असे शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या आहेत.
रायगडातील जनता वाऱ्यावरः ॲड. गौतम पाटील
गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. प्रशासन किती चांगले काम करते हे जिल्ह्यातील रस्ते, पाणी, अशा अनेक प्रश्नांवरून दिसून येत आहे. अलिबागचे प्रवेशद्वारासमोर खड्डे आहेत. त्यांची दुरुस्ती अद्याप करण्यात आली नाही. यापूर्वी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडून सोडविण्याचे काम केले आहे. मात्र, आता विद्यमान लोकप्रतिनिधींकडून दिसून येत नाही. त्यांना जनतेच्या प्रश्नांकडे बघण्यास फुरसत नाही, असे मत शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी मांडले.
शेतकरी कामगार पक्षाने शेतकरी, कष्टकरी, गोरगरीबांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला आहे. खोती, एसईझेड अशा अनेक प्रश्नांवर शेकापन आवाज उठवून सर्वसामान्य शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांना न्याय दिला आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे. मात्र, त्यांच्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्यामागे शेतकरी कामगार पक्ष ठाम उभा आहे. त्यांच्या हक्काची भरपाई मिळवून देण्यासाठी शेकाप मोठा लढा देईल. सध्या जिल्ह्यात रुमाल फिरवण्यात लोकप्रतिनिधी व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत त्यांना बोलायला वेळ मिळत नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे. महागाई, बेरोजागरीने त्रस्त झालेल्या वर्गाच्या पाठीशी शेकाप कायम राहील.
चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य मीडिया सेल अध्यक्ष तथा प्रवक्त्या