सत्ताधारी, विरोधकांचा राडा

कोकणात शिवसेनेशी झटापट
। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्यातील सत्ताधारी शिवसेना,काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष चिघळत चालला असून,सोमवारी हे तिन्ही पक्ष मुंबई आणि कोकणात आमनेसामने आल्याने रस्त्यावरच वातावरण तंग बनले .घोषणाबाजीसह परस्परांवर आरोप,प्रत्यारोप करण्यात उभयतांनी धन्यता मानली.या तिन्ही पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांना आवरताना पोलीस यंत्रणेची मात्र दमछाक झाली.

मुंबईत भाजप,काँग्रेस आमनेसामने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला असून त्यांनी माफी मागेपर्यंत भाजपा नेते, आमदार, खासदारांच्या घरापुढे, भाजप कार्यालयांपुढे आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. भाजपा कार्यालयांपुढे निदर्शने झाल्यावर सोमवारी फडणवीस यांच्या निवासस्थानापुढे आंदोलन केलं जाणार होतं. दरम्यान या आंदोलानमुळे भाजपा कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. पोलिसांनी त्यांना काही ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं आहे. नाना पटोले आंदोलनासाठी निघाले असताना पोलिसांनी अडवल्यावर त्यांनी पायी जाण्याची तयारी दर्शवली .

आम्हाला संदेश द्यायचा असून आम्ही इथेही आंदोलन करु शकतो. काँग्रेसच्या हाकेला आज सर्वांनी साथ दिला आहे. महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. आम्ही पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं पहिल्यापासून सांगत आहोत. आमची अहिंसेची भूमिका आहे. – नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

भाजपची घोषणाबाजी
काँग्रेसचा मोर्चा सागर निवासस्थानी आल्यास त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपाचे हे कार्यकर्ते जमले होते. यावेळी फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं की, नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्‍नच नाही. माफी मागायची असेल तर देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल काँग्रेसने मागावी. ङ्गहमसे जो टकरायेगा, मिट्टीमे मिल जायेगाफ अशा घोषणा यावेळी फडणवीसांसमोर देण्यात आल्या.

कुडाळमध्ये शिवसैनिक विरुद्ध राणे समर्थकात दमबाजी
कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. नगरपंचायतीच्या आवारात वाहने नेण्यास मनाई असतानाही शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी गाडी आत घुसवल्याने त्याला भाजप कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमकी उडाल्या. दरम्यान, कुडाळच्या नगराध्यपदी काँग्रेसच्या आफ्रिन करोल या विजयी झाल्या आहेत. त्यांना 9 मते मिळाली तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकरांना 8 मते मिळाली आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Exit mobile version