। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी विभाग अंतर्गत असणारे अनेक गावे तासनतास अंधारात असतात. सध्या ऑक्टोंबर हिट असतानाच विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. मात्र, दिवस-रात्र होणारा त्रास गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करत आहे.
तालुक्यातील गावोगावी सुरळीत सेवा देण्यासाठी तयारीचा दावा करणार्या वीज वितरण कंपनीचे पितळ नेहमी उघडे पडत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी परिसरात अनेक भागांसह ग्रामीण भागातील 23 गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. कार्ले, दांडगुरी, नागलोली, वाळवटी, मेघरे या गावांच्या परिसरातील एकूण तेवीस गावांत विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. ही गावे आड मार्गावर असून तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या गावांना विद्युत रात्रंदिवस विजेची गरज असताना दिवसातून पाच मिनिटे लाईट असला तर काही वेळात बंद होतो. ‘महावितरण’च्या वितरण व्यवस्थेतील काही त्रुटींप्रमाणेच या वेगवेगळ्या यंत्रणांच्या हलगर्जीपणाचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे. ऐन गरजेच्या वेळी वीज जाण्याचे प्रकार का होतात, असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याला ‘महावितरण’ची यंत्रणा काही प्रमाणात जबाबदार असल्याचा आरोप होतो आहे.