| लंडन | वृत्तसंस्था |
भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेला अजिंक्य रहाणे इंग्लंडमध्ये तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे. त्याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर संघाने एकदीवसीय चषक स्पर्धेतील ‘ब’ गटाच्या सामन्यात 369 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या नॉटिंगहॅमशायरला 89 धावांवर रोखले. रहाणेने लीसेस्टरशायरकडून पदार्पणाच्या सामन्यात 60 चेंडूंत 9 चौकारांसह 71 धावांची शानदार खेळी केली.
अजिंक्यच्या खेळीच्या जोरावर लीसेस्टरशायरने 50 षटकांत 6 बाद 369 धावा केल्या. सॉल बुडिंगरने 75 आणि कर्णधार लुईस हिलने 81 धावांची खेळी केली. लीसेस्टरशायरने नॉटिंगहॅमशायर संघासमोर 370 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईसच्या आधारे नॉटिंगहॅमशायरला 14 षटकांत 105 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. पण, नॉटिंगहॅमशायरला 6 बाद 89 धावाच करता आल्या.
अजिंक्य रहाणे सुमारे वर्षभरापूर्वी भारतीय संघाच्या जर्सीत दिसला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळला होता, त्यानंतर तो संघाबाहेर आहे. तो आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता, परंतु त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये लीसेस्टरशायरकडून खेळण्यासाठी गेला.