राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

 | मुंबई | वृत्तसंस्था |

देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केलं जात आहे. काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं 7 वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. काँग्रेसने आज महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर एक पाऊल पुढे जात काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्ही एका राजकीय पक्षाशी लढत नाहीत तर आम्ही संपूर्ण पायाभूत सुविधांशी लढत आहोत. जर कुणी विरोधकांना पाठिंबा देत असेल तर त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय लावले जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसत नाही. अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही हेच कळत नाही. ते म्हणतात स्टार्टअप इंडिया आहे, सांगा कुठे आहे स्टार्टअप इंडिया. लोकांना नोकरीवरुन काढलं जात आहे. सरकारचं म्हणणं आहे की, कोरोनामध्ये एकही मृत्यू झाला नाही. 5 दशलक्ष लोक मरण पावले असे संयुक्त राष्ट्र म्हणत आहे, परंतु सरकार म्हणत आहेत की हे सर्व खोटे आहे. बेरोजगारीबाबत सरकार म्हणते की यात तथ्य नाही. त्यांच्या हातात सगळी संवादाची साधनं आहेत, असंही ते म्हणाले.

Exit mobile version