मृत शेतकर्‍यांच्या माहितीवरुन राहूल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शेतकरी प्रश्‍नी पुन्हा एकदा काँग्रेस खा.राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. शेतकरी आंदोलनादरम्यान सुमारे 700 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. पंतप्रधानांनी देशाची आणि देशातील शेतकर्‍यांची माफी मागितली. त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले. पण केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आंदोलनादरम्यान किती शेतकर्‍यांचा मृत्यू झाला असा सवाल केला होता. पण त्यांच्याकडे याची माहिती नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते लोकसभेत बोलत होते.
आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि नोकरी द्यायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी लोकसभेत केली. पंजाब सरकारने 400 शेतकर्‍यांना प्रत्येकी 5 लाखांप्रमाणे नुकसान भरपाई दिली आहे; त्यापैकी 152 जणांना नोकर्‍याही दिल्या. माझ्याकडे मृत शेतकर्‍यांची यादी आहे. आम्ही हरियाणातील 70 शेतकर्‍यांची दुसरी यादी तयार केली आहे. पण तुमचे सरकार म्हणते की शेतकर्‍यांची नावे नाहीत, असे राहुल गांधी यांनी लोकसभेत निदर्शनास आणून दिले. त्यांनी लोकसभेत शेतकर्‍यांची यादी दाखवत केंद्र सरकारच्या कारभारवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

Exit mobile version