| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मोदी या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले होते. सूरत सत्र न्यायालयाने याप्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली असून, त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी 2019 साली केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सूरत न्यायालयाने त्यांना 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचं संसद सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपवर टीका करताना मोदी या आडनावावरुन टिप्पणी केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? मग ते ललित मोदी असो वा नीरव मोदी वा नरेंद्र मोदी, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात निकाल देताना सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.