| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीत बेधुंद दगडफेकीची घटना घडली होती. त्यानंतर आता त्याच राड्यात गोळीबार देखील झाल्याची बाब समोर आली आहे. कल्याण अडिवली येथील बैलगाडा मालक राहूल पाटीलच्या एका समर्थकाने पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे. याबाबत राहुल पाटीलसह त्याच्या १५ ते २० सहकाऱ्यांवर पनवेलमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार राहुल पाटील याच्या पनवेल शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला अटक करण्यात आली आहे. मागील वर्षी बैलगाडा शर्यतीवरुन झालेल्या एका वादामुळे तत्कालीन महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय पंढरीशेठ फडके आणि राहुल पाटील यांच्यामधील वाद टोकाला गेले होते. त्यात झालेल्या गोळीबारात पंढरीशेठ फडके दोषी ठरल्याने त्यांना जेलवारी करावी लागली होती. ते काही महिन्यांनी जेलमधून सुटून बाहेर आले आणि काही दिवसांतच त्यांचा प्रदीर्घ आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर शांततेत बैलगाडा शर्यती पार पडत असतानाच आता पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत अड्ड्यावर गोळीबाराची गंभीर घटना घडली आहे.
(दि.१२) रोजी पनवेलमधील ओवळे गावाजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेवटची लढत राहुल पाटील आणि जयेश पाटील गटात सुरू झाली. या लढतीत राहुल पाटील यांच्या बैलाचा पराभव झाला. जिंकलेल्या जयेश पाटील गटाने आनंदात गुलालाची उधळण केली. मात्र पराभव पचवू न शकल्यानं राहुल पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी तिथे जोरदार राडा केला. दोन्ही बाजूने तुफान दगडफेक करण्यात आली. याचवेळी राहुल पाटील यांच्या एका साथीदाराने पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी राहुल पाटील यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल केला होता. अखेर (दि.१५) रोजी राहुल पाटील याला पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.