राहुल, प्रियंका यांचा ‘रोड शो’

शरद पवार, उद्धव ठाकरेंच्याही सभा

| पुणे | प्रतिनिधी |

महाविकास आघाडीकडून प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून, पुण्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे ‘रोड शो’, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सहाही विधानसभा मतदारसंघांत सभा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्याचा निवडणुकीत फायदा होईल, असा विश्‍वास काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी येथे व्यक्त केला. ही निवडणूक मोदी आणि मोदीविरोधक अशीच आहे. मोदी विरोधकांची मते काँग्रेसला मिळतील, असा दावा धंगेकर यांनी केला.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामागे मोठा जनाधार कायम राहिला आहे. शिवसेनेची मोठी ताकद शहरात आहे. त्यामुळे मोदींची सभा झाली तरी, काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान होईल. त्यादृष्टीने राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे ‘रोड शो’ आणि शरद पवार यांच्या सहा विधानसभा मतदारसंघांत सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही धंगेकर म्हणाले.

सहाही विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य प्राप्त होईल. कसबा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातही मताधिक्य असेल. सध्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी नागरिकांची कामे करत आहे. लोकांच्या प्रश्‍नांसाठी झटत आहे, असे धंगेकर म्हणाले.

Exit mobile version