माणगावमधील जुगार अड्यावर धाड

। माणगाव । वार्ताहर ।

माणगावमधील अवैध जुगार अड्यावर पोलिसांचे धाडसत्र सुरूच असून सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी दि.12 दुपारी 3:15 वा. पोलिसांनी गावडे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे असलेल्या गल्लीत मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे सुग्रीव उद्धवराव मुंडे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली होती.

या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यातील आरोपी अमित कोळी (27) रा. नाणोरे आदिवासीवाडी व सउद डालोसे (35) रा. जुना माणगाव ता. माणगाव हे माणगाव येथील गावडे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे असलेल्या गल्लीत ‘डे महाराष्ट्र’ नावाचा मटका जुगार खेळण्याचे साहित्य जवळ बाळगून लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आले. या जुगार अड्याच्या ठिकाणाहून पोलिसांनी रोख रक्कम 825 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सानप हे करीत आहेत.

Exit mobile version