महाविद्यालयाजवळील स्मोकिंग शॉपवर छापा

हुक्का साठा जप्त

| पनवेल | प्रतिनिधी।

खारघर सेक्टर-4 येथील भूमी टॉवरमधील ‘द स्मोक शॉप’ या दुकानावर अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून सुमारे 92 हजार रुपये किमतीचा हुक्का फ्लेवर आणि हुक्का सेवनासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त केले. हे दुकान आयटीएम महाविद्यालयापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

खारघर परिसरात प्रतिबंधित हुक्का फ्लेवर तसेच हुक्का सेवनासाठी लागणारे तंबाखूजन्य साहित्य ग्राहकांना विकले जात असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित दुकानावर छापा टाकला. पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता विविध कंपन्यांचे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचे डबे, हुक्का पॉट आणि हुक्का पाईप आढळून आले. पोलिसांनी विविध कंपन्यांचे हुक्का फ्लेवरचे डबे, सहा हुक्का पॉट आणि चार हुक्का पाईप असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दुकानमालक मोहम्मद ताजुद्दीन अब्दुल्ला (22) याच्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version