पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 15 जणांना अटक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कर्जतमध्ये एका फॉर्म हाऊसमध्ये बनावट सिगारेट तयार करणार्या कारखान्यावर रायगड पोलिसांनी छापा टाकला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई करीत पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, 15 जणांना अटक केली आहे. गोल्ड फ्लॅक कंपनीच्या नावे बनावट सिगारेट तयार करण्याचा कारखाना चालविणार्यांचे कनेक्शन हैदराबाद येथील असल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
मुंबई, पुणे, ठाणे आदी मोठ्या शहरांच्या जवळ असलेला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आहे. या ठिकाणी धनदांडगे जागा घेऊन फार्म हाऊस बांधण्यावर अधिक भर देत आहेत. त्यामुळे या भागात फार्म हाऊस मोठ्या प्रमाणात आहेत. याच परिसरात अब्बास नावाचे फार्महाऊस आहे. चारही बाजूने बंद असलेल्या फार्म हाऊसमध्ये गोल्ड फ्लॅक कंपनीच्या नावाचे बनावट सिगारेट तयार होत असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी त्यांनी या अवैध धंद्यावर छापा टाकला. या छाप्यात सिगारेट तयार करण्यासाठी लागणारा माल, तसेच तयार सिगारेट व मशीन असा एकूण चार कोटी 94 लाख 46 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात तयार केलेले सिगारेट दोन कोटी, 31 लाख 60 हजार रुपये, सिगारेट तयार करण्यासाठी 15 लाख 86 हजार रुपये व सिगारेट तयार करण्यासाठी लागणार्या मशीनरी दोन कोटी 47 लाख रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे. या गुन्ह्यात 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील तिघेजण नागपूर परिसरातील असून, बाकीचे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड व उत्तरप्रदेश राज्यातील आहेत. यांच्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे करीत आहेत.
सहा महिन्यांपासून करोडोंचे सिगारेट बाजारात
कर्जत येथील फार्महाऊसमध्ये गोल्ड फ्लॅक कंपनीच्या नावाचे लेबल लावून सिगारेट तयार केले जात होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा कारखाना सुरू होता. सिगारेट बनविण्यासाठी लागणारी गोल्ड फ्लॅग कंपनीची संमती न घेता अवैध धंदा राजरोसपणे सुरु होता. महिन्यातील पंधरा दिवस या ठिकाणी काम सुरू होते. अठरा तासांमध्ये सुमारे 20 लाख रुपयांचा माल केला जात होता. त्यामुळे या सहा महिन्यांत करोडोे रुपयांचे बनावट सिगारेट बाजारात दाखल झाल्याचे समोर येत आहे.
मागणीनुसार मालाचा पुरवठा
सिगारेट बनविण्यात येणार्या कारखान्यात काम करणारे कामगार वेगवेगळ्या राज्यांतील होते. त्यातील तिघेजण व्यवस्थापक म्हणून काम पाहात होते. अब्बास नावाच्या फार्महाऊसमध्ये कारखाना चालत होता. मागणीनुसार माल तयार करून टेम्पोतून त्याची वाहतूक केली जात होती. हा फार्म हाऊस कोणीतरी शेट्टी नामक व्यक्तीने विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे. सिगारेटचा कारखाना चालविणारा म्होरक्या हैदराबाद येथील असल्याचा संशय असून, पोलीस त्याचा तपास करीत आहेत.
अवैध धंद्याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष
गेल्या सहा महिन्यांपासून कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिगारेटचा कारखाना सुरू होता. गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील प्रत्येक पोलीस कर्मचार्यांना गावे वाटून दिली जातात. तेथील संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम पोलीस करतात. परंतु, या अवैध धंद्यावर कर्जत पोलिसांचे दुर्लक्ष कसे राहिले, असा प्रश्न जनमानसातून उमटत असून, पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
फार्महाऊसवर राहणार पोलिसांची नजर
कर्जत येथील फार्महाऊसमधील बनावट सिगारेट प्रकरणानंतर रायगड पोलीस सक्रीय झाले आहेत. अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, माणगाव अशा अनेक भागात फार्महाऊसचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. बनावट सिगारेट घटनेनंतर जिल्ह्यातील फार्महाऊसवर पोलिसांची नजर राहणार आहे. त्यामध्ये महसूल विभागाचीदेखील मदत घेऊन तपासणी केली जाणार आहे. पोलीस ठाण्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.