| अलिबाग | प्रतिनिधी |
चिपळूणहून रोहा येथे गुटखा वाहतूक करणाऱ्या मारुती कारवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास वरसे फाटा येथे छापा टाकला. या छाप्यात गुटख्यासह 10 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने अवैध गुटखा विक्रेत्यांसह वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला आहे.
रोहा तालुक्यातील वरसे येथील दिलीप पलंगे हा इसम चिपळूणमधून रोहामध्ये गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार कराडे व पोलीस शिपाई मोरेश्वर ओमले यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, पोलीस हवालदार सूर्यवंशी, कराडे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, मोरेश्वर ओमले व पाटील यांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने रोहा येथे येणाऱ्या एम.एच. 06 सी.डी. 5734 या क्रमांकाच्या मारुती कारला रस्त्यात अडवले. कारमधील चालकासह दोघांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे पथकाचा संशय अधिक बळावला. कारची तपासणी केली असता कारमध्ये 2 लाख 83 हजार 800 रुपये किमतीचा गुटखा सापडला. अवैध गुटखा विक्री, वाहतुकीला बंदी असताना वाहतूक करणाऱ्या दिलीप पलंगे व नासिर इस्माईल नाईक (रा. रोहा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात अन्न व नागरी सुरक्षा मानके अधिनियम अंतर्गत रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहा येथे गुटखा वाहतुकीवर छापा
