व्यवस्थापकांसह वेश्याव्यवसायासाठी महिला पुरवणारे जोडपे अटकेत
| पनवेल | वार्ताहर |
पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सुकापूर येथील साई सम्राट लॉजवर छापा मारून त्याठिकाणी वेश्याव्यवसाय चालवणारे लॉजचे व्यवस्थापक व वेश्याव्यवसायासाठी महिला पुरवणारे जोडपे अशा चौघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी वेश्यागमनासाठी लॉजमध्ये आलेल्या चौघींची सुटका केली.
नवीन पनवेलमधील सुकापूर येथील साई सम्राट लॉजमध्ये व्यवस्थापक वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने लॉजवर छापा मारला. यावेळी वेश्याव्यवसायासाठी चार मुली व महिला ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या महिलांकडे चौकशी केली असता, त्यांना सबिना मोमीन मुल्ला (36) व जियारुल जोहरुल हक (34) या दोघांनी सुकापूर भागातील भगतवाडी येथील एका घरामध्ये ठेवल्याचे सांगितले, तसेच त्यांना व्यवस्थापकाच्या मागणीनुसार वेश्याव्यवसायासाठी सदर लॉजमध्ये पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संतोष साकेत (42) व अर्जुन गोस्वामी (36) या लॉज व्यवस्थापकाला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी भगतवाडी येथून सविना मुळा व जियारुल हक या जोडप्याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी चौघांसह लॉजचे मालक बालाजी व चिना या सहा जणांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच वेश्याव्यवसायासाठी आलेल्या चारही महिलांची सुटका केली.