मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी(दि.27) जाहीर झाला. या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा 96.75 टक्के लागला असून मुली 97.65 टक्के व मुले 95.87 टक्के उतीर्ण झाले आहेत. मात्र यंदाही निकालामध्ये मुली मुलांपेक्षा 1.78 टक्केने अधिक सरस असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. (दि.1) मार्च ते (दि.26) मार्च या दरम्यान दहावीची परीक्षा झाली. या परीक्षेसाठी 35 हजार 727 विद्यार्थी बसले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना परीक्षेच्या निकालाची उत्कंठा लागली होती. अखेर ही उत्कंठा सोमवारी संपली. दहावीचा निकाल पहाण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. तर काही विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अधार घेत घरच्या घरी निकाल पाहीला. दहावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 35 हजार 913 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 35 हजार 727 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधील 34 हजार 568 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.75 टक्के इतके आहे. एक हजार 159 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील पनवेल, माणगांव, म्हसळा, महाड या तालुक्यांचा निकाल 97 टक्केपेक्षा अधिक लागला असून उरण, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यांचा निकाल 96 टक्केपेक्षा अधिक, तर तळा मुरूड तालुक्याचा निकाल 95 टक्के पेक्षा अधिक, खालापूर, कर्जत या तालुक्यांचा निकाल 94 टक्के पेक्षा अधिक आणी सुधागड तालुक्याचा निकाल 92 टक्के लागला आहे. या पंधरा तालुक्यात 97.76 टक्के गुण मिळविण्यात पनवेल तालुका आघाडीवर आहे. त्या खालोखाल माणगाव (97.68 टक्के) तालुक्याचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 1.47 टक्क्यांनी दहावी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील 95.28 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
54.35 टक्के पुनर्परिक्षार्थी उत्तीर्ण रायगड जिल्ह्यातील 547 पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. यामधील 539 विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. त्यापैकी 293 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 246 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परिक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 54.35 टक्के इतके आहे.
जिल्ह्यातील निकालावर दृष्टीक्षेप
तालुके | मुले | मुली | एकूण टक्केवारी |
पनवेल | 96.99 | 98.57 | 97.76 |
उरण | 96.00 | 97.20 | 96.56 |
कर्जत | 93.84 | 96.07 | 94.97 |
खालापूर | 93.16 | 95.87 | 94.54 |
सुधागड | 91.97 | 93.27 | 92.59 |
पेण | 96.38 | 97.03 | 96.69 |
अलिबाग | 94.85 | 98.74 | 96.81 |
मुरूड | 93.31 | 98.46 | 95.99 |
रोहा | 95.22 | 97.93 | 96.54 |
माणगांव | 97.72 | 97.64 | 97.68 |
तळा | 92.59 | 98.08 | 95.54 |
श्रीवर्धन | 94.98 | 97.45 | 96.29 |
म्हसळा | 96.06 | 99.03 | 97.56 |
महाड | 97.73 | 97.41 | 97.58 |
पोलादपूर | 96.05 | 97.97 | 96.94 |
एकूण | 95.87 | 97.65 | 96.75 |
यंदा दहावीचा निकाल चांगल्या पध्दतीने लागला आहे. चांगले गुण मिळवून विद्यार्थ्यांनी शाळेसह पालक व गाव व तालुक्याचे नाव लौकीक केले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच जे विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत. त्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यास करून यशस्वी व्हावे.त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
पंडित पाटील
माजी आमदार