रायगड भूषण रंगावली चषक

। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील दिवंगत अष्टपैलू कलाकर, रायगड भूषण बाळ वर्तक यांच्या स्मरणार्थ श्रीचिंचबादेवी देवस्थान ट्रस्ट, बोर्लीपंचतन यांच्या वतीने, गुरूवार दि. 18 नोव्हेंबर रोजी त्रिपुरा पोर्णिमा विशेष सामाजिक संदेशात्मक रंगावली स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.
परिसरातील सर्वांचेच लाडके आणि प्रसिद्ध कलाकार बाळ वर्तक त्यांच्या चित्रकला, पाककला, नृत्य, नकला तथा रांगोळी अशा विविध कलांमुळे प्रसिद्ध होते. गतवर्षी आजाराने त्यांचे निधन झाले. तीन वर्षांपूर्वी खेड्यापाड्यातील कलाकारांना आपली कला दाखवता यावी, यासाठी श्रीचिंचबादेवीच्या मंदिरात जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती.
यावर्षी, त्यांच्याउपरोक्ष ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यांची कलेविषयची आत्मियता सार्थकी लागावी यासोबतच त्यांचे नित्यस्मरण रहावे, हा हेतू आहे.
स्पर्धेसाठी कोरोना जग, निसर्ग चक्रीवादळ असे दोन विषय असून, यापैकी कोणत्याही एका विषयावर 36-42 आकाराची रंगावली साकारायची आहे. स्पर्धकांना रंगावली काढताना मकर अथवा इतर साहित्याचा वापर करता येणार नसून, रंगावली काढण्यासाठी स्पर्धकांनी 17 नोव्हेंबर 2021 रोजी उपस्थित रहाणे, बंधनकारक असणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश मर्यादित असून, प्रवेशाची अंतिम नोंदणी 10 नोव्हेंबर पर्यंत करता येणार आहे. प्रवेश नोंदणी तथा अधिक माहितीसाठी समीर धनावडे-96730 79121, मयूर कविलकर-89834 33341, ऋषिकांत गायकर-90282 00974 यांच्यासह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version