| अलिबाग | प्रतिनिधी |
रुग्णालयाच्या आवारात असलेल्या सांडपाण्याबाबत कृषीवलने गुरुवारी आवाज उठविला. कृषीवलच्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे झाले. गुरुवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांनी प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावर योग्य ती उपाययोजना करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या मागील बाजूला बालरोग कक्ष आहे. या कक्षामध्ये लहान मुलांवर उपचार केले जातात. मुलांच्या सदृढ आरोग्यासाठी रुग्णालय काम करीत असताना या कक्षाच्या परिसरात असलेल्या सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रुग्णालय परिसर झाला उकिरडा या मथळ्याखाली कृषीवलने गुरुवारी बातमी प्रसिध्द केली. या बातमीच्या दणक्याने रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासन जागे झाले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विशाल देवकर यांनी गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जागेची पाहणी केली. दुर्गंधी निर्माण होऊ नये यासाठी त्या ठिकाणी खडी, मातीचा भराव करून तात्पुरत्या स्वरुपात प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न तात्पुरता सुटण्याची शक्यता आहे.
मार्चपर्यंत सांडपाण्याचा प्रश्न सुटणार
रुग्णालयातील सांडपाण्याचा निचरा करण्याचे काम लवकरच सुरु केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्यामार्फत निधी मिळवून रुग्णालय चांगल्या पध्दतीने बनविण्याचा प्रयत्न आहे. सुरक्षा भिंतीचाही प्रश्न सोडविला जाणार आहे. मार्चपर्यंत सांडपाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास माने यांनी सांगितले.