26 टक्के ठेवी वाढीवर सहकार आयुक्तांकडून गौरव
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नोंदविलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी बँकेचे विशेष कौतुक केले. बँकेने चालू आर्थिक वर्षात आपल्या ठेवींमध्ये तब्बल 26 टक्क्यांनी वाढ नोंदविल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करताना, “रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही प्रगती राज्यातील सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी असून, बँकेच्या व्यवस्थापनाने केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे,” असे गौरवोद्गार काढले. पुणे येथे वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूट (व्हीएमएनआयसीओएम) येथे झालेल्या राज्य शासन आणि नाबार्ड यांच्या संयुक्त सभेमध्ये हा गौरव करण्यात आला. जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांनीही या यशाचे कौतुक करत, ही कामगिरी संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब असून, आरडीसीसी बँकेचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे उद्गार काढले.
दरम्यान, सहकार क्षेत्रातील गृहनिर्माण सहकारी संस्था, पतसंस्था, अर्बन बँका तसेच इतर विविध सहकारी संस्थांच्या एकत्रित विकासासाठी आणि परस्पर समन्वय वाढीसाठी गतवर्षीप्रमाणे या आर्थिक वर्षात या संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकरिता विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांनी दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आर्टिफेशियल इंटेलिजन्स, डिजिटल बँकिंग, वित्तीय व्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि आधुनिक सहकार व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून, त्यामुळे सहकार क्षेत्रातील संस्थांना एकत्रितपणे कार्य करण्याची अधिक व्यापक संधी आणि संपूर्ण सहकार व्यवस्थेला अधिक तंत्रज्ञानस्नेही बनविण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस नाबार्डचे जनरल मॅनेजर प्रदीप पराते, कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, तसेच राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा उपनिबंधक उपस्थित होते. यावेळी सहकार आयुक्तांनी बँकेने नव्याने विकसित केलेल्या पीक कर्जवाटपातील डिजिटल प्रणालीचाही विशेष उल्लेख करत अभिनंदन केले. या उपक्रमामुळे कर्जवाटप प्रक्रियेत अधिक गतिमानता निर्माण होणार असून, भविष्यात माहिती अधिक वेगाने उपलब्ध होण्यास मदत होईल, असे मत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी व्यक्त केले.
सहकारी संस्थांकरिता बँकेचे योगदान आदर्शवत : जयंत पाटील
आर्थिक बाबतीतही बँकेची घोडदौड कायम असून, मार्च 2026 अखेर एकत्रित व्यवसाय 7105.33 कोटी रुपये इतका झाला होता. त्यामध्ये या आर्थिक वर्षात सातत्यपूर्ण वाढ होत असून, एप्रिल 2026 अखेर बँकेचा एकत्रित व्यवसाय 7391 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षात बँक आपल्या नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारे 8500 कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण करणार असून, मार्च 2028 अखेर बँक 10,000 कोटींचा व्यवसाय पूर्ण करून ऐतिहासिक यश संपादन करेल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच बँकेचे सहकार क्षेत्रातील योगदान जिल्ह्यातीलच नव्हे तर, राज्यातील सहकारी संस्थांकरिता आदर्शवत ठरेल, असेही जयंत पाटील म्हणाले.
