Rain Updates: रायगड जिल्ह्यात पावासाचा तडाखा

 |रायगड । प्रतिनिधी । 


 रायगड जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावासाची जोर कायम आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली असून, नदीकिनाऱ्यावरील गावांना पूराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. अबा आणि कुंडलिका नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, नागोठणे आणि रोहा शहरातील सखल भागात पूराचे पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. पाताळगंगा नदीही इशारा पातळीच्या वर वाहत असल्यामुळे त्यामुळे नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावासाचा जोर कायम होता. पावसाच्या मध्यम ते तीव्र सरी कोसळत होत्या. अंबा कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवर वाहत होत्या होत्या. यापैकी कुंडलिका आणि अंबा नद्यांनी आता धोका पातळी ओलांडली आहे. अंबा नदीची धोका पातळी ९ मीटर असून सध्या तील ९.३० मीटर पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नागोठणे शहर आणि परिसराला पूराचा धोका निर्माण झाला आहे. नागोठण्याची सखल भागात पूराचे पाणी शिरण्यास सुरूवात झाल्याने, बाजारपेठ, मच्छीमार्केट, बस स्थानक परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कुंडलिका नदीची डोलवाहल बंधारा येथे धोका पातळी २३.९५ मीटर असून सध्या ती २४ मीटर पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे रोहा शहर आणि लगतच्या परिसराला पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे भिरा जलविद्यूत केंद्राचे तिनही दरवाजे उघडण्यात आले असून, प्रती सेकंद १२४ घन मीटर वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कुंडलिका नदीच्या पातळीत आणखिन वाढ होण्याची शक्यता आहे.

अलिबाग, माणगाव, रोहा, तळा, खालापूर, कर्जत, म्हसळा आणि मुरुड तालुक्यात घर आणि गोठ्यांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलादपूर सोनारवाडी येथे दरड कोसळली असून, २ कुटूंबातील सात जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. संततधार पावसामुळे  रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. हेटवणे मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर गेला आहे. तर २८ लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा ६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

एकाच दिवसात पाणी साठ्यात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे ११ लघुपाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरली आहेत. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसांचा जोर कायम आहे. अलिबाग, पनवेल, खालापूर, कर्जत, पेण, म्हसळा या तालुक्यांना शनिवारी मुसळधार पावसाचा तडखा बसला आहे. भिसे खिंडीत झाड कोसळल्याने रोहा नागोठणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Exit mobile version