अलिबाग ग्रंथोत्सव! पुस्तकांमुळे माणूस घडतो-इंदुमती जोंधळे

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पुस्तके आपल्याला घडवतात. विचार देतात. पुस्तके माणूस म्हणून आपल्याला श्रीमंत करतात. त्यामुळे ज्या घरात पुस्तकाचे कपाट ते घर श्रीमंत आहे. माणूस म्हणून दुसर्‍याच्या मनाचा विचार आपल्याला करता आला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका इंदुमती जोंधळे यांनी सोमवारी (दि.14) अलिबाग येथे केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल, अलिबाग येथे रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष अलिबाग प्रशांत नाईक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ज्योत्स्ना शिंदे, कोमसाप जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सुचिता पाटील, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर म्हणाले की, ग्रंथोत्सवात विविध विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या डिजिटल युग चालू आहे. मात्र या डिजिटल युगात तुम्ही जोपर्यंत पुस्तक हातात घेणार नाहीत आणि त्या पानांचा आवाज किंवा पानांचा सुवास वाचताना दरवळणार नाही तोपर्यंत माझ्या मते डिजिटल पुस्तकांची ओळख पुढच्या पिढीला होणार नाही.

आजही दिवाळी आली की, आपण दिवाळी अंक खरेदी करतो. ते आवडीने वाचतो. तरुण पिढीमध्ये या डिजिटल चळवळीमध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये पुस्तकाचा सुवास नक्कीच दरवळला पाहिजे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही ग्रंथोत्सवाचे आयोजन केल्यास त्याचा निश्‍चितच फायदा होईल. जी पुस्तके जीर्ण झाली आहेत, अशा पुस्तकांच्या डिजिटायझेशनसाठी देखील सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.

डॉ.महेंद्र कल्याणकर,जिल्हाधिकारी


Exit mobile version