पोषण महिना अभियान लोकसहभागात रायगड जिल्हा प्रथम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सप्टेंबर महिन्यात महिन्यात पोषण महिना अभियान राबविण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, जिल्ह्यात अभियानाला उत्तम लोकसहभाग मिळाल्याने राज्यात लोकसहभागामध्ये रायगड जिल्हाने अव्वलस्थान पटकाविले असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली आहे.

माता आणि बालके सदृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पोषण महिना अभियान 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राब राबविण्यात आले. अभियानात महिनाभरात जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन कालावधी दरम्यान हात स्वच्छ धुण्याचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच माह कालावधीत गावांमध्ये प्रभातफेरी काढून आरोग्य व पोषण विषयक संदेशाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. त्याचप्रमाणे अनेमिया मुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त केलेल्या शाळांच्या नोडल अधिकार्‍यांच्या मदतीने पोषण माहमध्ये नियमितरीत्या शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजन दरम्यान लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व सेवन होईल असे नियोजन करण्यात आले होते.प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण माह कालावधी दरम्यान एक टी-3 कॅम्पचे आयोजन करून विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली.

तसेच पोषण माहमध्ये एएनएम आणि आशा स्वयसेविका यांनी गृहभेटी देऊन जनजागृती केली. पोषण माह कालावधीमध्ये अंगणवाडी स्तरावर एक समुदाय आधारित कार्यक्रम, ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण दिवस व बालक संगोपन आधारित पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या समन्वयाने पोषण माह कालावधीमध्ये सॅम बालकांच्या व्यवस्थापणासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्राचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमात लोकसहभाग घेण्यात आला.पोषण महिना अंतर्गत जिल्ह्यातील 17 प्रकल्पांमध्ये 27 लाख 44 हजार 876 उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाल्याने राज्यात लोकसहभागातून रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

पोषण महा उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, कृषी पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य यांचे सहकार्य लाभले. तसेच जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मेहनत घेतली.पोषण महिना अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. महिनाभरात जिल्ह्यात 27 लाख 44 हजार 876 उपक्रम राबविण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत या उपक्रमासाठी लोकसहभाग लाभल्याने, लोकसहभागात रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.- डॉ. किरण पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

Exit mobile version