। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कार्यासन अधिकारी प्रेमानंद सोनटक्के यांनी आदेश काढला असून, पदाचा गैरवापर करून कामकाज केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे पाटील यांच्या विरोधात त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्या दोषी असल्याचे आढळून आले. प्राथमिक चौकशी अहवालातील निरीक्षणे विचारात घेता त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही सुरु करण्याचे योजिले आहे. त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई तात्काळ करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. हे निलंबन आदेश जोपर्यंत अंमलात आहेत, तोपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 व्या नियम 16 मधील तरतुदीनुसार खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही. स्वतःला व्यापार, उद्योगामध्ये गुंतवून घेता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून निर्वाह भत्ता मिळविण्यास अपात्र ठरविले जाईल. आदेश अंमलात असेपर्यंत ठाणे येथील आरोग्य सेवा मुंबई मंडळ उपसंचालक हे मुख्यालय राहील. सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे लेखी आदेश काढण्यात आले आहेत.







