रायगड जिल्ह्यात धुवाँधार बॅटींग

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याला काल आणि आज असा दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. दिवसभरात पावसाने धुवाँधार बॅटींग केली. नद्या, नाले दुथडी भरुन वाहत होती. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पुढील 72 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यामध्ये 103.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 245 मिमी पाऊसाची नोंद श्रीवर्धन तालुक्यात झाली आहे. सर्वात कमी 33 मिमी पाऊस अलिबाग तालुक्यात पडला आहे. समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील 28 लघू प्रकल्पांपैकी 22 धरण पूर्ण क्षमतेने भरले असून विसर्ग सुरु आहे. आतापर्यंत दरडप्रवण गावातून 526 कुटूंबातील 1 हजार 752 जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावासाने पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. 7 आणि 8 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यात रेड अर्लट जारी करण्यात आला होता., तर 9, 10 आणि 11 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अर्लट हवामान विभागाने जाहिर केला आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुुसळधार पाऊस पडणार आहे.

शनिवार पासूनच पावसाने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला 7 आणि 8 ऑगस्टरोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र हवामानात बदल झाल्याने ऑरेंज अलर्टचे रुपांतर रेड अलर्टमध्ये झाले. रविवारी आणि सोमवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सातत्याने काळे ढग दाटून येत असल्याने सुर्य दर्शन झाले नाही.जिल्ह्यातील सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, उल्हास, गाढी आणि आंबा नद्या चांगल्याच दुथडी भरुन वाहत होत्या.

दडी मारलेल्या पावसाने शेतीची कामे खोळंबली होती मात्र जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. अजून दोन दिवस पाऊस बरसला नसता तर, शेतातील भाताचे पिक करपले असते. मात्र पावसाने बरसुन शेतातील पिक आता वाचण्यास मदत झाली आहे, असे येथील शेतकरी राजाराम पारंगे यांनी सांगितले.

गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यामध्ये 103 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 245 मिमी पाऊसाची नोंद श्रीवर्धन तालुक्यात झाली आहे. म्हसळा तालुक्यात 213 मिमी, रोहो- 145 मिमी, अलिबाग- 33 मिमी. पेण-52 मिमी, मुरुड-102 मिमी, पनवेल, 73.60 मिमी, उरण- 38 मिमी, कर्जत-45.20 मिमी, खालापूर-65 मिमी, माणगाव- 121 मिमी, सुधागड-72 मिमी, महाड 89 मिमी, पोलादपूर-113 मिमी माथेरान 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बंदरात तीन नंबरचा बावटा
मुंबई मोरा जलवाहतूक बंद

वादळी पावसामुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्ट यामुळे जिल्ह्यातील सर्व बंदरांमध्ये धोक्याचा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांना मासेमारीसाठी बंदरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढील आदेश येईर्पंत मुंबई ते मोरा या जलमार्गावरील जलवाहतूक फेरी देखील बंद ठेवण्यात आली आहे.

Exit mobile version