पुरूष गटात जय बजरंग बेली तर
महिला गटात कर्नाळा स्पोर्टस् अजिंक्य
| अलिबाग । हिरामण भोईर ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे व निखिल मयेकर मित्र मंडळ नागाव यांच्या संयोजनाखाली पाच दिवस पुरुष व महिला गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत पुरुष गटात 256 तर महिला गटात 16 संघांनी भाग घेतला होता. उत्कंठावर्धक या स्पर्धेत पुरुष गटात अलिबाग तालुक्यातील जय बजरंग क्रीडा मंडळ बेली व कर्जत तालुक्यातील आर.आर.स्पोर्टस् कर्जत यांच्यात अंतिम फेरीचा सामना झाला. यामध्ये बेली संघाने 6 गुणांनी कर्जत संघाचा पराभव करुन अंतिम विजेतेपद पटकावले तर महिलांमध्ये कर्नाळा स्पोर्टस् पनवेल या संघाने भिल्लेश्वर किहीम-अलिबाग या संघाचा 39 गुणांनी पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले.

याआधी पहिल्या उपांत्य फेरीत जय बजरंग बेली संघाने मरीदेवी धेरंड संघाचा एका गुणाने पराभव करुन अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळविला. दुसर्या उपांत्य फेरीत आर.आर.स्पोर्टस् कर्जत या संघाने पांडवादेवी रामवाडी संघाचा दोन गुणांनी पराभव करुन अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळविला हे दोन्ही सामने उत्कंठावर्धक झाले. महिलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भिल्लेश्वर किहीम संघाने टाकादेवी मांडला संघाचा एका गुणाने पराभव करुन अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळवला तर दुसर्या सामन्यात कर्नाळा स्पोर्टस् पनवेल संघाने ओंकार वेश्वी, संघावर 21 गुणांनी मात करुन अंतिम फेरीत खेळण्याचा मान पटकावला. अंंतिम सामन्यात कर्नाळा स्पोर्टस क्लबने टाकादेवी संघावर मात करुन विजेतेपद पटकाविले. पुरुष संघाचे विजेते जय बजरंग बेली संघाला मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते महिला गटातील विजेत्या कर्नाळा स्पोर्टसला चषक प्रदान करण्यात आले तर भिल्लेश्वर किहीम संघाला द्वितीय क्रमांकाचा चषक उमेश ठाकूर यांच्या हस्ते तृतीय विजेता ओंकार वेश्वीला संघाला अनिल पाटील यांच्या हस्ते तर चतुर्थ विजेता टाकादेवी, मांडवा संघाला माजी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच पुरुष संघाचे पारितोषिक वितरण नागावचे सरपंच निखिल मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतून निवडण्यात येणारा संघ राज्यस्पर्धेत रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधीत्व करेल.

यावेळी रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष जंगम, युवा नेते सवाई पाटील, आंबेपुरच्या सरपंच सुमना पाटील, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना कीर, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, पायलट कृतज्ञा हाले, आरडीसीसी बँकेचे सीईओ मंदार वर्तक, प्रो कबड्डीतील प्रसिद्ध माजी खेळाडू निलेश शिंदे, मनाली गावंड आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा उत्कंठावर्धक
कबड्डी स्पर्धा म्हटली की, रायगड जिल्ह्यातील एक रांगडा लाल मातीत खेळला जाणारा खेळ आहे. या जिल्ह्यात अनेक छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू संघटक आहेत. या सर्वांच्या पदस्पर्शाने निखिल मयेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली रायगड जिल्हा निवड चाचणी स्पर्धा निखिल मयेकर मित्र मंडळातर्फे आयोजित केली होती. या स्पर्धेत 272 संघांनी आपआपली कसब दाखविली. कोणत्याही प्रकारची तक्रार न होता विनातक्रार ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे हर्षदा मयेकर या प्रत्येक दिवशी क्रीडागणांवर येऊन पुर्ण सामन्यावर लक्ष ठेवत होत्या. क्रीडांगण व्यवस्था सुंदर होती. सुसज्य अशी प्रेक्षक गॅलरी उभारली होती. या खेळाचे प्रक्षेपण जिल्ह्यात नव्हे तर पुर्ण भारतात दिसेल अशा युट्युब चॅनेलची व्यवस्था केली होती. पंचांची, सर्व पदाधिकारी यांची भोजन व्यवस्थाही उत्तम होती. या स्पर्धेत आमदार जयंत पाटील, आ. अनिकेत तटकरे, माजी मंत्री अनंत गीते, विविध पक्षांतील नेते आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, कलाकार असे अनेक जणांची उपस्थिती एक चांगला संदेश देऊन गेली.

उत्तम नियोजन
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे तथा राज्याचे कार्यवाह अॅड. आस्वाद पाटील व त्यांचे सर्व संघानी पाच दिवस सतत लक्ष ठेवून होते. सर्व पंचांची कामगिरी देखील उत्तम झाली. ही स्पर्धा पाहायला जिल्ह्यातील बरेच क्रीडाप्रेमी आले होते. गॅलरी पुर्ण भरल्याने बाहेर स्क्रीन लावल्या होत्या. स्क्रीनवर स्पर्धा पाहण्यासाठी खुप गर्दी होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी जुन्या काळातील मातब्बर खेळाडूंची उपस्थिती लक्षणीय होती. या सर्व मंडळींचा मंडळातर्फे आदर सत्कार केला जात होता हे विशेष.