रायगड जिल्हा पालकमंत्र्याविना पोरका!

जिल्ह्याच्या पालकत्वाचा तोडगा निघेना

| कापोली | प्रतिनिधी |

महाराष्ट्राच्या निवडणुका होऊन दीड वर्ष उलटून गेले आहे. प्रत्येक पक्षाने गेली निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली होती. महाराष्ट्रातील लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला होता. लोकांनी लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीच्या पदरात टाकल्या होत्या. जागेंच्या खेचाखेचीमध्ये अडकलेल्या महाविकास आघाडीला जनतेने अनपेक्षित धक्का देत विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने दिला. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे पारचा दिलेला नारा सत्यात उतरवून विधानसभा काबीज केली. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने दमदार विजय मिळवत 235 जागा पटकावल्या आहेत.

रायगडमध्ये सर्वाधिक आमदार शिंदे गटाचे असल्याने शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी बाजू लावून रायगडचा पालकमंत्री आमचाच असायला हवा, असा हट्ट धरून आदिती तटकरेंसमोर आव्हान उभे केले. आज-उद्या करता-करता एक वर्ष उलटून गेले तरी रायगडच्या पालकमंत्र्यांचा तिढा सुटताना दिसत नाही. त्यामुळे दोघांच्या भांडणामुळे रायगडच्या विकासाला एकप्रकारे खीळ बसलेली आहे अशी चर्चा मतदारसंघात सुरु झाली असून, हा तिढा लवकरात लवकर सोडवावा, अशी जिल्ह्यातील जनतेची मागणी आता जोर धरू लागली आहे.

बहुचर्चित मुंबई-गोवा महामार्ग अजूनही पूर्ण होत नाही. ही जबाबदारी कुणाची? असा प्रश्न वारंवार विचारला जात असूनदेखील कोकणासह रायगड जिल्ह्यातील आमदार, खासदार पेटून उठत नाहीत, त्यामुळे जनतेची प्रचंड नाराजी आहे. लोकांच्या मनात एकप्रकारचा रोष आहे. तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न तर दुर्लक्षितच आहे. रोजगार उपलब्ध नसल्याने तरुण बेकार बसून आहेत, तरुणांची जबाबदारी कोण स्वीकारणार? रोजगार नसल्याने रायगड जिल्ह्यातील अनेक गावे ओस पडली असून, परिवारच्या परिवार मुंबईत स्थलांतरीत झाले आहेत. सणासुदीला गावे गजबजलेली असतात. मोठमोठे कारखाने कधी येणार? दोघांच्या भांडणात रायगड जिल्ह्याचे नुकसान होत आहे.

रायगडमधील अनेक गावातील विकासकामे मोठ्या निधींमुळे अडकलेली आहेत. पालकत्व असेल तरच कुणीतरी जिल्ह्याला वाली उरेल, असे लोकांचे म्हणणे आहे. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या दोघांच्या वादात रायगड जिल्ह्याचे नुकसान का? असा प्रश्न आता लोकं विचारु लागले आहेत.

Exit mobile version