‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीयस्थानी
| रायगड | प्रतिनिधी |
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्याने राज्यस्तरावर दुसरा, विभागीयस्तरावर प्रथम आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या क्षितिजावर रायगड जिल्ह्याच्या शाळांनी आपले नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे. राज्यस्तरावर पहिला क्रमांक वाशिम जिल्ह्यातील साखरा जिल्हा परिषद शाळेने पटकावला आहे. द्वितीय क्रमांक रायगडच्या कर्जत-हेदवली जिल्हा परिषद शाळा, तर तृतीय क्रमांक सांगली जिल्ह्यातील दहीवडी या जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाला आहे.
खासगी शाळांमध्ये राज्यस्तरावर नाशिक जिल्ह्यातील एस्पालियर, द हेरिटेज स्कूलने पहिला क्रमांकावर नाव कोरले आहे. पुणे जिल्ह्यातील शारदाबाई पवार, विद्यानिकेतनने दुसरा क्रमांक, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भोंडवे पाटील पब्लिक स्कूलने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शाळांना लाखोंची बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.5) दुपारी 1 वाजता मुंबई, नरीमन पॉईंट येथील टाटा थियटरमध्ये हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे.
दरम्यान, अभियानांतर्गत शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम आदींची तपासणी तज्ज्ञ समितीच्यावतीने करण्यात आली होती.
विभागीय स्तरावरील निकाल सरकारी शाळांमध्ये ठाणे जिल्ह्यातील वाशिंद जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक, पालघर जिल्हा परिषद शाळा नवघर शाळा द्वितीय आणि रायगड जिल्ह्यातील रोहा नगर पालिका उर्दु शाळेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच खासगी गटामध्ये विभागीयस्तरावर रायगड जिल्ह्यातील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर शाळेने पहिल्या क्रमांकावर नाव कोरले आहे. ठाणे जिल्ह्यातील बिर्ला सेकंडरी स्कूल दुसऱ्यास्थानी, तर पालघर जिल्ह्यातील उचाट-आसपे हायस्कूलला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.