रायगड जिल्ह्याचा बारावीचा निकाल 99.81 टक्के

मुलींचा टक्का तसूभर पुढेच
तळा, म्हसळा तालुक्याचा निकाल 100 टक्के
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातील बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 99.81 टक्के इतका लागला आहे. मुलांचा 99.76 तर .10 टक्क्यांनी पुढे जात मुलींनी 99.86 टक्के यश संपादन केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक तळा आणि म्हसळा तालुका निकाल शंभर टक्के तर खालापूर आणि महाड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 99.95 टक्के तर अलिबाग तालुक्याने 99.92 टक्के यश मिळवित हमी कुछ कम नही हे दाखवून दिले आहे. दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागला आहे. कोविड-19 विषाणू महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. बारावीचे अंतर्गत मूल्यमापन तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधून 28 हजार 760 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंद केली होती. त्यापैकी सर्वच्या सर्व 28 हजार 760 विद्यार्थी परिक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 28 हजार 706 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 54 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यात 15 हजार 097 मुले तर 13 हजार 609 मुलींचा समावेश आहे. जिल्ह्यातील तळा आणि म्हसळा तालुक्याचा निकाल शंभर टक्के लागला असून त्या खालोखाल खालापूर तसेच महाड तालुक्यात 99.95 टक्के, तर अलिबाग तालुक्यात 99.92 टक्के, पनवेलमध्ये 99.86, कर्जतचा 99.84, श्रीवर्धनचा 99.75 टक्के, उरण 99.73 तर माणगाव पोलादपूर 99.72, रोहा तालुका 99.68 तर मुरुड 99.60, पेण 99.49 आणि सुधागड तालुका 99.35 टक्के निकाल लागला आहे.

आरसीएफ स्कूलचा निकाल शंभर टक्के
अलिबाग तालुक्यातील आरसीएफ स्कूलचा बारावीच्या परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. या शाळेतील 187 विद्यार्थी परिक्षेसाठी प्रविष्ठ होती. त्यापैकी 80 टक्के विद्यार्थ्यी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले. तर प्रथम श्रेणीत 96 आणि द्वितीय श्रेणीत 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Exit mobile version