रायगड दुमदुमला…शिव घोषाने

म्हसळात सर्वपक्षीय शिवजयंती संपन्न

म्हसळा शहरात सर्वपक्षीय शिवजयंती मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. यामध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट ), शिवसेना (शिंदे गट ), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने भाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, शहर प्रमुख विशाल सायकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, संजय कर्णिक, योगेश करडे, मंगेश म्हशीलकर, अनिकेत पानसरे, नगरसेविका राखी करंबे, प्रसन्ना निजामपूरकर, प्रसाद बोर्ले, तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, उपशहर प्रमुख दिपल शिर्के, शहर संपर्क प्रमुख अभय कलमकर, शहर संघटक कल्पेश जैन, युवा सेना चिटणीस राहुल जैन, शहर अधिकारी अजय करंबे, गौरी पोतदार, बाबू बनकर, यतीन करडे, संतोष उद्धरकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसैनिक आणि सर्वपक्षीय नेते यांनी आयोजित केलेल्या म्हसळा बस स्थानक ते ग्राम दैवत श्री धावीर महाराज मंदीरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा संपन्न झाला. सोहळ्यात वेशभुषा परिधान केलेले बालशिवाजी, मावळे झालेले बालकलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. चॅम्पियन कराटे क्लब श्रीवर्धन -म्ह सळाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले कराटे प्रात्यक्षिक शिवजयंतीला प्रमुख आकर्षण ठरले. सिहान संतोष मोहिते, सेंसाई अविनाश मोरे, रितेश मुरकर, अनिकेत साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके अतिशय उत्तम प्रकारे सादर करण्यात आली. यामध्ये 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यात मुलींनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सोहळ्यात शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिक ग्रामस्थ महिला भगिनींनी पारंपरक वस्त्र परिधान करून सहभाग घेत शिवजयंती उत्सव साजरा करून शिवकालीन इतिहासाची आठवण करून दिली.

एसटीमध्ये शिव जयघोष

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती आज 28 मार्च रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्यांमध्ये महाराजांच्या पोवाड्याचे स्वर ऐकायला मिळाले. महामंडळाने आपल्या एसटीमध्ये असलेल्या ध्वनिक्षेपक यांचा वापर प्रवाशांना महाराजांची गाथा पोवाडे ऐकवले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्यकर्तृत्व सातासमुद्रापार पोहचले आहे. आज महाराजांची तिथीप्रमाणे जयंती साजरी होत आहे. शासनाच्या आदेशाने रेल्वे स्थानकात महाराजांच्या जीवनाचा आढावा घेणारी गाणी ऐकवण्याचा उपक्रम राबविला. त्याचवेळी राज्य परिवहन महामंडळाने आपल्या गाड्यांवर ज्याप्रमाणे जय महाराष्ट्र.. प्रवाशांच्या सेवेसाठी असे लिहिले आहे. त्यानुसार आज अनेक एसटी गाड्यांमध्ये छत्रपतींची गाणी,पोवाडे प्रवाशांना ऐकवले. नव्याने बांधणी केलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमध्ये प्रवाशांना सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक बसवले आहेत. त्या ध्वनिक्षेपकांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी प्रवाशांना शिवरायांचे पोवाडे ऐकवून मंत्रमुग्ध केले. राज्य परिवहन महामंडळाच्या या उपक्रमाबद्दल प्रवाशांना सुखद धक्का बसला. दररोज एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांना गाडी सुरू झाल्यावर आपल्या जाणत्या राजाचे कार्यकर्तृत्व पोवड्यामधून ऐकता आले.

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू असताना देखील छत्रपतींच्या जयंतीला परिवहन महामंडळाच्या गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र ऐकण्याची संधी मिळाली. त्यामुळे राजाचा इतिहास जीवंत आहे आणि देशात राज्यात काही होऊ द्या, महाराजांचे विचार कायम राहतील असा संदेश या निमित्ताने एसटी महामंडळाने देण्याचा प्रयत्न केल.


बाहे गावचा परिसर जय भवानी जय शिवरायांच्या गर्जनेने दुमदुमला
रोहा तालुक्यातील ताज्या भाजीपाला पिकांसाठी विशेष सुप्रसिध्द असलेल्या बाहे या गावामध्ये संपन्न झालेला शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दरम्यान संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमात जय भवानी जय शिवरायांच्या गर्जनेने गावचा परिसर दुमदुमला.

गेल्या 10 वर्षांची यशस्वी परंपरा राखत संपन्न झालेल्या या उत्सव सोहळ्यानिमित्त शिवजयंतीच्या आदल्या दिवशी रात्रौ.10 वा.किल्ले रायगडाकडे शिवज्योत आणण्यासाठी शिवभक्तांनी प्रस्थान करून शिवजयंतीच्या दिवशी पहाटे 4 वा.जगदिश्‍वर मंदिर रायगड येथे शिवज्योतीचे प्रज्वलन करून किल्ले रायगड ते बाहे नगरी शिवस्मारक पर्यंत एक धाव माझ्या राजासाठी या अंतर्गत सकाळी 9 वा. बाहे नगरी शिवस्मारक येथे शिवज्योतीचे आगमन झाले. तद्नंंतर शिववंदना व मशाल मिरवणूक काढण्यात आली. तर सायं.7 वा.गावातील शिवकन्या यांचे व्याख्यान व रात्रौ.9 वा.स्नेहभोजन आदी कार्यक्रम संपन्न करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमात संपुर्ण ग्रामस्थ व महिला तसेच गावदेवी शिवप्रेमी तरूण मंडळाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या उत्सवाची शोभा वाढविली

रसायनीत शिवजयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदू पध्दतीनुसार फाल्गुन वद्य तृतीया, फाल्गुन शके यावेळेस जन्म झाला. त्यानुसार 28 मार्च 2024 रोजी रसायनी-पाताळगंगा परिसरातील मोहोपाडा, नवीन पोसरी, चांभार्ली, कैरे, तळवली, वावेघर, इसांबे या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौकात शिवभक्तांनी शिवपुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. जयंती निमित्त शिवभक्तांनी विविध कार्यक्रम राबवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे शिवभक्तांनी सांगितले.

गडब येथे शिवजयंती साजरी

ग्रामस्थ मंडळ खारघाट व हनुमान स्पोर्ट्स क्लब खारघाट गडब यांचे संयुक्त विद्यमाने तिथी प्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्यांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत पारंपारिक वेशभूषेत पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या शिवजयंती निमित्त कीर्तन, महाराजांची आरती, ग्रामस्थ मंडळ खारघाट – गडब यांचे भजन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version