रायगडातील निवडणुका आघाडी म्हणून लढणार

खा.सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन; कर्जतमध्ये कार्यकर्ता मेळावा

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत आणि खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे, होता आणि पुढेही राहणार असून, आगामी काळात होणार्‍या सर्व निवडणुकात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्धार खा.सुनिल तटकरे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा कर्जत येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आ. सुरेश लाड, जिल्हा अध्यक्ष मधूकर पाटील, अशोक भोपतराव, भगवान चंचे, तानाजी चव्हाण, अजय सावंत, संतोष बैलमारे, अंकित साखरे, सागर शेळके, रंजना धुळे यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी तटकरे म्हणाले की, जिल्ह्यातील सरकारी यंत्रणा आणि प्रशासन आपलेच आहे असे वागणार्‍या मनोवृत्ती प्रवृत्तीला जनताच ठेचून काढेल. जिल्ह्यात आणि मतदारसंघात सुरू असलेली कावकाव पितृपक्षातील पितरच शांत करेल. लागोपाठ शस्त्रक्रिया झाल्यानंतर पूर्ण विश्रांती घेवून सुरेश लाड मैदानात उतरले आहेत. 40 वर्षापूर्वीचा त्यांचा जोश दिसून येत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकावर राहील, असे देखील यावेळी तटकरे यांनी जाहीर केले.

आगामी काळात रायगड जिल्ह्यातील निवडणूक लढण्यासाठी आघाडी करण्याचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीने आपल्याला दिले आहेत. मात्र आपण महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकांना सामोरे जाणार आहोत, असेही सुनील तटकरे यांनी यावेळी जाहीर केले.

माजी आ. लाड यांनी कर्जतच्या लोकप्रतिनिधीने गोवा येथे हॉटेलमध्ये केलेल्या डान्सबद्दल बोलताना उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली घेतल्याचा आनंद साजरा केला काय? असा प्रश्‍न उपस्थित केला. तसेच पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील विचाराने चालणारे असल्याने जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती यांच्या निवडणुका घोषित होण्याची वाट पाहत आहोत, असा सूचक इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

1999 मध्ये अवघ्या 15 दिवसात विधानसभा जिंकणारे लाड यांना कमी लेखण्याची कोणीही चूक करू नये. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोकणचे पालकमंत्री वाटताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले. त्यानंतर पालकमंत्री बनलेल्या अदिती तटकरे यांना पहिल्या दिवसापासून आडकाठी करणार्‍यांनी कोरोनाकाळात देखील काम करताना किती साथ दिली, याचा आता जनताच विचार करील.

खा. सुनिल तटकरे, राष्ट्रीय सरचिटणीस

खालापूर, खोपोलीत आढावा बैठक
खोपोली नगरपालिका आणि खालापुर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका आगामी काळात होऊ घातल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ताकई विठ्ठल मंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीला माजी आ. सुरेश लाड, हनुमंत पिंगळे, उमाताई मुंढे, उल्हासराव देशमुख, शरद कदम, नरेश पाटील, संतोष बैलमारे, अंकित साखरे, विश्‍वनाथ पाटील, तुकाराम साबळे, महादू जाधव,वैशाली जाधव, केविना गायकवाड, शिल्पा सुर्वे, सुवर्णा मोरे, श्‍वेता मनवे, साक्षी घोसाळकर, अंजु सरकार, अतुल पाटील,गौरव दिसले, प्रसाद कर्णूक,शेखर पिंगळे, सुरेश पाटील, भूषण पाटील सुत्रसंचालन महेंद्र सांवत यांनी केले.

Exit mobile version