| महाड | प्रतिनिधी |
शिवभक्तांचे तीर्थस्थान असलेल्या किल्ले रायगडावरील सुरक्षा व्यवस्था पुर्णपणे विस्कळीत झाली असुन, गडावर गेल्या चार ते पाच वर्षांपासुन सुरक्षारक्षक म्हणुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरातत्व विभागाने अचानक कामावरुन काढल्याने, गेल्या काही दिवसांपासुन किल्ले रायगडावरील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेला परिसर अत्यंत महत्वाचा तसेच अति संवेदनशिल असल्याने किल्ला सुरक्षित ठेवणे पुरातत्व विभागाचे काम आहे. मात्र या विभागाच्या मनमानी कारभारामुळे किल्ल्याची सुरक्षाच धोक्यात आली आहे. शासनाने किल्ले रायगड वरील सुरक्षा व्यवस्थेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवभक्तांकडून करण्यांत येत आहे.
गडावरील प्रत्येक इमारती, मंदिरे त्याचबरोबर समाधीस्थळ, राजदरबारांमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठीत मेघडंबरीतील पुतळा अश्या अनेक वास्तु आणि ठिकाणे महत्वाची असताना यांची सुरक्षा काळजीपूर्वक करणे आवश्यक असताना, गडावरील 18 सुरक्षा रक्षकांना पुरातत्व विभागाने कामावरुन कमी केले असल्याची माहिती मिळाली. किल्ले रायगड हा सी झोन मध्ये समाविष्ट करण्यात आल्याने जे पूर्वी सुरक्षा रक्षकांना वेतन दिले जात होते त्यामध्ये पाच हजार रुपयांची कपात करण्यांत आली असल्याची माहिती कामावरुन कमी करण्यात आलेल्या काही सुरक्षा रक्षक तरुणांनी सांगितली.
पायरी मार्ग बंद
जिल्हा प्रशासनाने किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पूर्र्णपणे बंद केला आहे. शिवभक्तांनी केवळ रोपवेचा वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पायरी मार्ग असुरक्षित असल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाने काढताना दरीडी कोसळत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून कधीही पावसाळ्यात पायरी मार्ग बंद करण्यात आला नव्हता. परंतु या वर्षीच पायरी मार्ग धोक्याचा असल्याचे आढळून आले.
रोप-वे शुल्क महाग
रोप-वेचे शुल्क प्रति व्यक्ती 350 आकारले जात असल्याने सर्वच शिवभक्तांना गडावर रोप-वेने जाणे शक्य होत नाही. मात्र शासनाच्या पायरी मार्ग बंदचा निर्णय रोप-वे या खाजगी कंपनीला फायद्याचा ठरला आहे. गडावर काम करणाऱ्या पुरातत्व विभागाच्या सुरक्षा रक्षकांना गडावर जाण्याकरीता रोप-वेचे शुल्क आकारले जाते. मिळणाऱ्या वेतनांमध्ये दररोज रोप-वेने जाणे स्थानिक सुरक्षा रक्षकांना परवडणारे नसल्याने आणि पायरी मार्ग बंद करण्यात आल्याने सुरक्षा रक्षकांना नोकरीवर हजर होणे शक्य नसल्याने पुरातत्व विभागाने सर्व सुरक्षा रक्षकांना कामावरुन कमी केले आहे. त्यांना वेतन देखिल देण्यात आले नसल्याचे सांगण्यांत आले.
किल्ले रायगडावरील सुरक्षा व्यवस्था पुरातत्व विभागाने ‘एसआयएस’ या सुरक्षा एजन्सीची नेमणूक केली आहे. या एजन्सीकडून गडावरील सुरक्षा कशा प्रकारे करण्यात येते या बाबत कोणतीही माहिती मिळत नाही. या सुरक्षा एजन्सीने स्थानिक तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून कामावर घेतले. या तरुणांना जे वेतन दिले जाते ते कमी दिले जात असल्याचे समजले. तरुणांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. पुरातत्व विभागाचा मनमानी कारभार गडावर केला जात असल्याने स्थानिक तरुणांवर नेहमीच अन्याय केला जातो. सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.